Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिंचकर यांच्या आत्महत्येनंतर नवी मुंबईपोलिसांनी सोमवारी दोन अधिकाऱ्यांना ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. याच अधिकाऱ्यांनी ड्रग्ज प्रकरणात गुरुनाथ चिंचकर यांचा जबाब नोंदवला होता. त्यानंतर गुरुनाथ चिंचकर यांनी राहत्या घरात आत्महत्या केली होती. चिंचकर यांनी एका सुसाईड नोटमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि नवी मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांकडून छळ होत असल्याचा आरोप केला होता. या छळाला कंटाळून गुरुनाथ चिंचकर यांनी आत्महत्या केली.
एनसीबीने चिंचकर यांचा लंडनमध्ये राहणारा मुलगा नवीन हा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा सूत्रधार असल्याचा आरोप केला होता. त्यानुसार एनसीबीने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दुसरीकडे, नवी मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानेही चिचकर यांचा धाकटा मुलगा धीरज याच्यावरही गुन्हा दाखल केला होता. नवी मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात यापूर्वी दोन जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीदरम्यान दोन्ही अधिकाऱ्यांची नावे समोर आली.
शुक्रवारी सकाळी ६.४५ च्या सुमारास, बेलापूर येथील किल्ले गावठाण येथील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहणारे चिंचकर त्यांच्या तळमजल्यावरील कार्यालयात गेले होते. काही तासांनंतर त्यांच्या पत्नीला चिंचकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. कार्यालयात चिचकर यांनी स्वतःच्या बंदूकीतून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. तपासादरम्यान, चिंचकर यांनी त्यांच्या आईला उद्देशून एक सुसाईड नोट लिहून ठेवल्याचे समोर आले. सुसाईड नोटमध्ये चिंचकर यांनी, मी एनसीबी आणि नवी मुंबई पोलिसांकडून आलेल्या समन्सला कंटाळलो आहे, असं म्हटलं होतं.
गुरुनाथ चिंचकर यांनी एनसीबीला उद्देशून तीन पानांचे पत्रही लिहीले होते. यामध्ये त्यांनी बांधकाम व्यावसायिक होण्यासाठी कठोर परिश्रम केल्याचे म्हटलं होते. "मला काही वर्षांपूर्वीच मोठ्या मुलाच्या ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागाची माहिती मिळाली होती. धाकट्या मुलालाही तो निर्दोष असतानाही ड्रग्ज प्रकरणात गोवण्यात आले होते. याप्रकरणी काही लोकांनी एजंट म्हणून काम केले आणि माझ्या मुलांविरुद्धचे सर्व खटले निकाली काढण्यासाठी १० कोटी रुपयांची मागणी माझ्याकडे केली होती. जर त्यांना पैसे दिले असते तर त्यांनी प्रकरण निकाली काढली असते," असेही चिंचकर यांनी पत्रात म्हटले.