Navi Mumbai Municipal Corporation initiative to remedy tree growth on increasing pollution | वाढत्या प्रदूषणावर वृक्षलागवडीचा उपाय, नवी मुंबई महापालिकेचा पुढाकार
वाढत्या प्रदूषणावर वृक्षलागवडीचा उपाय, नवी मुंबई महापालिकेचा पुढाकार

नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रामध्येही धूलिकणांचे प्रमाण वाढत आहे. शहरातील वाढणारे प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने जास्तीत जास्त वृक्षलागवड करण्यास सुरुवात केली आहे. वर्षभरामध्ये तब्बल ६७,५५२ वृक्ष लावले आहेत. ट्री बेल्ट विकसित करण्यावरही लक्ष केंद्रित केले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने पर्यावरण अहवाल नुकताच सर्वसाधारण सभेमध्ये मांडला. महापालिका कार्यक्षेत्रामध्ये धूलिकणांचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरामधील हवाप्रदूषण कमी केले नाही तर भविष्यात त्यांचे गंभीर परिणाम शहरवासीयांना सहन करावे लागण्याची शक्यता आहे. यामुळे महापालिकेने फक्त काँक्रीटचे जंगल उभे करण्यापेक्षा जास्तीत जास्त वृक्षलागवड करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. गत वर्षभरामध्ये तब्बल ३१ ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली.

अडवली व भुतावली परिसरामध्ये वनविभागाबरोबर त्रिपक्षीय करार करून २५ हजार वृक्ष लावले आहेत. महापालिकेची उद्याने, दुभाजक, मोकळे भूखंड, रोडच्या बाजूची जागा व इतर ठिकाणीही वृक्षलागवड केली जात आहे. राबाडा येथे माजी महापौर सुधाकर सोनावणे यांनी ओसाड टेकडीवर वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करण्यास सुरुवात केली आहे. दहा वर्षांपूर्वी ओसाड असलेल्या टेकडीवर दाट वनराई विकसित केली आहे. सानपाडामध्ये निसर्गप्रेमी नागरिकांनी रोड व मोकळ्या भूखंडावर हिरवळ विकसित केली आहे.

महापालिकेने ट्री बेल्ट व उद्यानांमधील वृक्ष संवर्धनासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केली आहे; पण एमआयडीसीतील वृक्ष संवर्धनाकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. गतवर्षी दिघा धरणाच्या पायथ्याशी लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठीची सोय नसल्याने अनेक रोपे कोमेजली आहेत. यामुळे निसर्गप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. वृक्षलागवडीचा आकडा महत्त्वाचा नाही. लागवड केलेल्यापैकी प्रत्यक्ष किती वृक्ष जगले याचे सर्वेक्षण करण्याची आवश्यकता असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले आहे.

80ठिकाणी मोकळ्या जागा
शहरात तब्बल ८० ठिकाणी मोकळ्या जागा आहेत, यामध्ये सीबीडीमध्ये २२, नेरुळमध्ये सात, सानपाडामध्ये एक, वाशी व कोपरखैरणेमध्ये प्रत्येकी ११, घणसोलीमध्ये सात, ऐरोलीमध्ये नऊ, पामबीच रोडवर दहा व ठाणे-बेलापूर रोडवर दोन ठिकाणांचा समावेश आहे. दोन लाख ८४ हजार चौरस मीटरवर मोकळी जागा असून तेथेही वृक्षलागवड केली जात आहे. आठ ठिकाणी ट्री बेल्ट विकसित केले आहेत.

शहरातील उद्याने व मोकळ्या
जागांचा तपशील
विभाग उद्याने क्षेत्रफळ
सीबीडी ३८ ४७४२८
नेरुळ ३३ १४५५८२
सानपाडा, तुर्भे १३ ७०७०५
वाशी ३३ १६६०२३
कोपरखैरणे १५ ५०१०८
घणसोली ०५ ९८७२
ऐरोली २५ १०९५४९
 


Web Title: Navi Mumbai Municipal Corporation initiative to remedy tree growth on increasing pollution
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.