नवी मुंबईतील जमिनी फ्री होल्ड होणार !

By Admin | Updated: February 23, 2016 02:25 IST2016-02-23T02:25:42+5:302016-02-23T02:25:42+5:30

राज्य सरकारच्या निर्देशानुसार नवी मुंबईतील जमिनी फ्री होल्ड करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. जमिनी फ्री होल्ड करताना किती शुल्क आकारायचे, याचा सध्या सिडको अभ्यास करीत आहे.

Navi Mumbai land will be free! | नवी मुंबईतील जमिनी फ्री होल्ड होणार !

नवी मुंबईतील जमिनी फ्री होल्ड होणार !

- कमलाकर कांबळे,  नवी मुंबई
राज्य सरकारच्या निर्देशानुसार नवी मुंबईतील जमिनी फ्री होल्ड करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. जमिनी फ्री होल्ड करताना किती शुल्क आकारायचे, याचा सध्या सिडको अभ्यास करीत आहे. त्यामुळे जमिनी फ्री होल्ड करण्याच्या नवी मुंबईकरांच्या जुन्या मागणीला लवकरच मूर्त स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवी मुंबईतील बहुतांशी जमिनी सिडकोने लिजवर दिल्या आहेत. ६0 वर्षांनंतर लिज कालावधी संपुष्टात येणार असून या जमिनींची मालकी पुन्हा सिडकोकडे जाणार आहे. सिडकोनिर्मित सदनिका उभ्या राहिलेल्या जमिनीचे लिज आजही सिडकोकडे आहे. त्यामुळे गेली कित्येक वर्षे लिजचाच आर्थिक भुर्दंड येथील रहिवाशांना सोसावा लागत आहे. यापार्श्वभूमीवर सिडकोने येथील जमिनी फ्री होल्ड कराव्यात अशी येथील रहिवाशांची जुनी मागणी आहे.
नवी मुंबई शहराची निर्मिती सिडकोने केली. १९९४ मध्ये नवी मुंबई महापालिका अस्तित्वात आली. त्यामुळे या विभागाच्या नियोजनाची जबाबदारी महापालिकेवर आली. त्यानंतर सिडकोचे गृहप्रकल्प महापालिकेच्या अधिकारक्षेत्रात आले आहेत. या गृहप्रकल्पांना महापालिका सोयी-सुविधा प्रदान करत आहे. गृहप्रकल्पांसाठी राज्य सरकारने कन्हेयन्स डीड मोहीम सुरू केली आहे. सदनिकाधारक जमिनीचे मालक व्हावेत, अशी यामागची शासनाची भूमिका आहे. मात्र नवी मुंबईतील बहुतांशी जमिनी सिडकोच्या लिजवर असल्याने कन्हेयन्स डीडच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. औरंगाबाद येथे सिडकोने गृहप्रकल्पांच्या जमिनी फ्री होल्ड केल्या आहेत. त्याच धर्तीवर नवी मुंबईतील जमिनीही फ्री होल्ड कराव्यात, अशी मागणी सर्वप्रथम माजी खासदार संजीव नाईक यांनी लावून धरली होती. या मागणीसाठी त्यांनी विविध स्तरावर पाठपुरावा केला होता. परंतु आता सरकारनेच लिजवर असलेल्या शासकीय जमिनी फ्री होल्ड करण्याचा निर्णय घेतल्याने याचा फायदा नवी मुंबईतील लाखो सदनिकाधारकांना होणार आहे.

Web Title: Navi Mumbai land will be free!