नवी मुंबई हे देशाचे डेटा सेंटर हब - देवेंद्र फडणवीस
By सूर्यकांत वाघमारे | Updated: May 11, 2023 16:31 IST2023-05-11T16:30:54+5:302023-05-11T16:31:11+5:30
Devendra Fadnavis : नवी मुंबई पोलीस दलाच्या सायबर सेलचा विस्तार करून त्याला पोलिस ठाण्याचे स्वरूप देण्यात आले आहे.

नवी मुंबई हे देशाचे डेटा सेंटर हब - देवेंद्र फडणवीस
नवी मुंबई : देशाची ६५ टक्के डेटा सेंटर क्षमता ही नवी मुंबईत असल्याने हे शहर डेटा सेंटर हब बनत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुंबईची पुढची वाढ हि नवी मुंबई परिसरात होणार आहे. विमानतळ व ट्रान्स हार्बर मार्ग झाल्यानंतर नवी मुंबई परिसरात मोठी गुंतवणूक वाढणार आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाचेही महत्व वाढणार असल्याने पोलिसांनी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अद्यावत होण्याची गरजही त्यांनी वाशी येथे कार्यक्रमात व्यक्त केली.
नवी मुंबई पोलीस दलाच्या सायबर सेलचा विस्तार करून त्याला पोलिस ठाण्याचे स्वरूप देण्यात आले आहे. शिवाय महिला सहाय्यता कक्षाची देखील अडगळ दूर करण्यात आली आहे. यासाठी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या प्रयत्नाने नेरुळ येथे स्वतंत्र जागेत सायबर पोलिस ठाणे व महिला सहाय्यता कक्ष सुरु करण्यात आला आहे. त्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तर महिलांच्या सुरक्षेसाठी तयार केलेल्या निर्भया पथकाला वाशी येथे झेंडा दाखवण्यात आला. याप्रसंगी फडणवीस यांनी येत्या काळात नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाचे महत्व अधिक वाढणार असल्याचे सांगत भविष्यातल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अद्यावत होण्याच्या सूचना केल्या.
महिलांच्या सुरक्षेबाबत देखील त्यांनी वक्तव्य करत देशातील मेगासिटींमध्ये मुंबई सर्वाधिक सुरक्षित शहर असल्याचेही फसडणवीस म्हणाले. महिलांवर अत्याचार करणारे मानसिक रुग्ण असतात. तर ९० टक्के अत्याचाराचे गुन्हे हे ओळखीच्या व्यक्तींकडूनच झालेले असतात. मात्र आजवर समाजाच्या दडपणामुळे हे गुन्हे दाबले जात होते. त्यामुळे गैर प्रवृत्तीच्या व्यक्ती उपडणे वावरत होत्या. परंतु तक्रारदार महिला पुढे यऊ लागल्याने गुन्ह्यांची संख्या वाढत असली तरीही गुन्हेगारांवर जरब घालण्याचा प्रयत्न पोलिस करत असल्याचेही ते म्हणाले. तर पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांनी महिला सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलीस कटिबंध असल्याचे सांगितले. त्याच उद्देशाने निर्भया पथक ही संकल्पना राबवली जात असल्याचेही ते म्हणाले.
सिने दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी देखील नवी मुंबई पोलिसांच्या महिला सुरक्षेच्या दृष्टीने उपक्रमांचे कौतुक केले. शहरात सुरक्षेच्या दृष्टीने सिडको, पनवेल महापालिका, नवी मुंबई महापालिका यांच्या माध्यमातून आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही बसवले जात असल्याचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार गणेश नाईक, मंदा म्हात्रे, आमदार महेश बालदी, प्रशांत ठाकूर, पोलिस सह आयुक्त संजय मोहिते आदी उपस्थित होते.