Navi Mumbai: बंदी झुगारून गेलेले पर्यटक नवी मुंबईतील धबधब्याजवळ अडकले, ५० जणांची सुटका
By सूर्यकांत वाघमारे | Updated: July 21, 2024 20:36 IST2024-07-21T20:33:29+5:302024-07-21T20:36:02+5:30
Navi Mumbai News: सीबीडी येथील धबधब्याच्या ठिकाणावरून सुमारे ५० पर्यटकांची सुटका करण्यात आली. पावसामुळे पाण्याचा प्रवाह अडकल्याने हे पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले होते. याची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्कालीन यंत्रणा तसेच पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेऊन या पर्यटकांची सुटका करण्यात आली.

Navi Mumbai: बंदी झुगारून गेलेले पर्यटक नवी मुंबईतील धबधब्याजवळ अडकले, ५० जणांची सुटका
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - सीबीडी येथील धबधब्याच्या ठिकाणावरून सुमारे ५० पर्यटकांची सुटका करण्यात आली. पावसामुळे पाण्याचा प्रवाह अडकल्याने हे पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले होते. याची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्कालीन यंत्रणा तसेच पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेऊन या पर्यटकांची सुटका करण्यात आली.
सीबीडी सेक्टर ८ बी येथील डोंगर भागात असलेल्या धबधब्याच्या ठिकाणी पर्यटक जात असतात. मात्र वाट चुकल्याने तसेच पाणी वाढल्यास पर्यटक अडकण्याचा घटना घडत असतात. यामुळे त्याठिकाणी पावसाळ्यात पर्यटकांना बंदी घातली जाते. त्यानंतरही वेगवेगळ्या मार्गाने काहीजण धबधब्यापर्यंत पोहचत असतात. रविवारी देखील नवी मुंबईसह मुंबई परिसरातील काहीजण त्याठिकाणी पोलिसांची नजर चुकवून गेले होते. मात्र दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरु होताच वाहत्या पाण्याचा प्रवाह वाढला होता. यामुळे धबधब्याच्या ठिकाणी तसेच मधल्या टप्प्यावर काहीजण अडकून पडले होते. तर धुक्यासह मुसळधार पावसामुळे काहीजण वाट चुकले होते. याची माहिती मिळताच सीबीडी अग्निशमन दलासह आपत्कालीन यंत्रणेचे पथक व सीबीडी पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेतली.
यावेळी रस्सीच्या साहाय्याने सुमारे ५० पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तर बचावकार्याची माहिती मिळताच महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी देखील त्याठिकाणी जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त शिरीष आरदवाड, उपायुक्त शरद पवार हे देखील उपस्थित होते. गतवर्षी देखील त्याच ठिकाणी काही पर्यटक अडकले होते. यामुळे यंदा सदरचे ठिकाण पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. त्यासाठी महापालिकेमार्फत सदर धबधब्याच्या मार्गावर तारेचे कुंपण घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र सलग सुरु असलेल्या पावसामुळे कामात अडथळा आल्याने कुंपण लागू शकलेले नाही. तर सीबीडीतल्या घटनेपाठोपाठ पावणे एमआयडीसी मध्ये देखील साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी दोघेजण अडकून पडल्याची माहिती मिळताच त्यांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले.