नवी मुंबईचे सिंगापूर होऊ शकते

By Admin | Updated: May 31, 2017 06:22 IST2017-05-31T06:22:37+5:302017-05-31T06:22:37+5:30

नवी मुंबईचे सिंगापूर होवू शकते, त्याकरिता नागरिकांच्या मानसिकतेमध्ये बदलाची गरज माजी मंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केली

Navi Mumbai can be Singapore | नवी मुंबईचे सिंगापूर होऊ शकते

नवी मुंबईचे सिंगापूर होऊ शकते

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबईचे सिंगापूर होवू शकते, त्याकरिता नागरिकांच्या मानसिकतेमध्ये बदलाची गरज माजी मंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केली आहे. नाईक कुटुंब भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगत असतानाच मंगळवारी वाशीत कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी पक्ष वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येवर जागतिक पर्यावरण दिनी प्रभागनिहाय स्वच्छता करून वृक्षारोपण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
बेलापूर विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून माजी मंत्री गणेश नाईक हे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच चार दिवसांपूर्वी नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचा वाशीत कार्यकर्ता मेळावा घोषित करण्यात आला होता. यामुळे सदर मेळाव्यात नाईक कुटुंब कोणत्या प्रकारचा राजकीय स्फोट करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. प्रत्यक्षात मात्र मंगळवारी वाशीतील भावे नाट्यगृहात झालेल्या मेळाव्यात तसे काहीच घडले नाही. माजी मंत्री गणेश नाईक यांनी कोणतेही राजकीय भाष्य न करता केवळ उपस्थितांना मानसिक बळ देत शिस्तीचे धडे दिले. नवी मुंबईचे सिंगापूर अथवा दुबई होवू शकते, फक्त त्याकरिता प्रत्येकाने आपल्या मानसिकतेमध्ये बदल घडवायला हवा, असे ते म्हणाले. काही सेकंदासाठी सिग्नलवर वाहन थांबले असता, पाठीमागून हॉर्न वाजवणाऱ्यांनी संयम बाळगायला हवा, अन्यथा वाहन चालवताना केलेली घाई प्राणावर बेतू शकते हे त्यांनी काही उदाहरणांसह सांगितले. हेच सामाजिक भान प्रत्येकाने जपण्याचा सल्ला त्यांनी दिला. त्याशिवाय १० जूनला राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन असल्याने, ५ जूनला जागतिक पर्यावरण दिनाच्या संध्येवर प्रभागनिहाय स्वच्छता मोहीम राबवण्याच्या व प्रत्येकी एक झाड लावण्याच्याही सूचना गणेश नाईक यांनी केल्या. भविष्यात पैसा अथवा संघटन यावरच राजकारण करणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने संघटनात्मक बांधणीला प्राधान्य देवून जनतेच्या सेवेत सदैव उपलब्ध राहावे. जमेल त्या पध्दतीने त्यांच्या शैक्षणिक, वैद्यकीय तसेच कौटुंबिक समस्या सोडवाव्यात, तरच जनता तुम्हाला पैसे धुडकारून आपलेसे करतील हे सांगत नाईक यांनी त्यांच्या १९९५ सालच्या विक्रमी विजयाचे उदाहरण दिले. याप्रसंगी आमदार संदीप नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, माजी खासदार संजीव नाईक, जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, महिला जिल्हा अध्यक्षा माधुरी सुतार, स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, सभागृह नेते जयवंत सुतार यांच्यासह इतर नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Navi Mumbai can be Singapore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.