Navi MumbaI: ऐतिहासिक बेलापूर किल्याचे सुशोभीकरण रखडले, संवर्धनाचे काम ठप्प, दोन वर्षाची होती मुदत
By नामदेव मोरे | Updated: December 3, 2023 12:36 IST2023-12-03T12:36:39+5:302023-12-03T12:36:47+5:30
Navi Mumbai News: नवी मुंबईमधील एकमेव ऐतीहासीक ठेवा असलेल्या बेलापूर किल्याचे संवर्धन व सुशोभीकरण करण्याचे काम सिडकोने २०१९ मध्ये सुरू केले होते. दोन वर्षात काम पूर्ण होणे अपेक्षीत होते. परंतु चार वर्षानंतरही काम पूर्ण झालेले नाही.

Navi MumbaI: ऐतिहासिक बेलापूर किल्याचे सुशोभीकरण रखडले, संवर्धनाचे काम ठप्प, दोन वर्षाची होती मुदत
- नामदेव मोरे
नवी मुंबई - नवी मुंबईमधील एकमेव ऐतीहासीक ठेवा असलेल्या बेलापूर किल्याचे संवर्धन व सुशोभीकरण करण्याचे काम सिडकोने २०१९ मध्ये सुरू केले होते. दोन वर्षात काम पूर्ण होणे अपेक्षीत होते. परंतु चार वर्षानंतरही काम पूर्ण झालेले नाही. सद्यस्थितीमध्ये सर्व काम ठप्प असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
खाडी किनाऱ्याचे संरक्षण करण्यासाठी १५६० मध्ये बेलापूर किल्ला बांधण्यात आला. १७३३ मध्ये चिमाजी आप्पा यांनी हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. जवळपास ८४ वर्ष तो मराठा साम्राज्याचा भाग होता. साडेचारशे वर्षांची ऐतीहासी पार्श्वभुमी असलेल्या किल्याला पुर्वी पाच बुरूज होते. त्यापैकी तीन बुरूज पूर्णपणे नाहीसे झाले असून दोन बुरूजांचे अवशेष शिल्लक आहेत. या किल्याचे संवर्धन करावे यासाठी इतिहासप्रेमींनी वारंवार पाठपुरावा केला होता. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सिडको व शासनाकडे किल्ला संवर्धनासाठी पाठपुरावा केला होता. आमदारांच्या अभ्यासगटालाही पाहणीसाठी बोलावले होते. यानंतर सिडकोने किल्ला संवर्धनाचा निर्णय घेतला. १६ जून २०१९ मध्ये प्रत्यक्षात सुशोभीकरणाचे काम सुरू झाले होते. यासाठी १८ कोटी रूपये मंजूर करण्यात आले होते.
सिडकोने सुशोभीकरणाचे काम सुरू केल्यानंतर गडावर भिंतींचे बांधकाम पूर्ण केले आहे. एक वॉच टॉवरही बांधण्यात आला आहे. महानगरपालिका मुख्यालयाबाहेरील बुरूजाचीही दुरूस्ती केली होती. परंतु काही नागरिकांनी बुरूजाला सिमेंट वापरण्यास हरकत घेतली. पुरातन वास्तूंचे संवर्धन करण्याच्या नियमावलीप्रमाणे संवर्धन व्हावे अशी भुमीका घेतली. यानंतर विविध कारणांनी संवर्धन व सुशोभीकरणाचे काम बंद झाले आहे. दोन वर्षामध्ये काम पूर्ण होणे अपेक्षीत होते. पण चार वर्षानंतरही ते पूर्ण झालेले नाही. सद्यस्थितीमध्ये काम पूर्णपणे ठप्प असून ते पुन्हा सुरू करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दोन हेक्टर परिसराचे सुशोभीकरण
बेलापूर किल्यावरील ऐतीहासीक बुरूजाचे संवर्धन करून दोन हेक्टर परिसराचे निसर्ग पर्यटनस्थळामध्ये रूपांतर केले जाणार होते. परंतु प्रत्यक्षात संरक्षण भिंतींच्या उभारणीव्यतिरिक्त इतर कोणतेच काम पूर्ण झालेले नाही.
चौकट
पुढील कामे होती प्रस्तावीत
बेलापूर किल्ला परिसराचे पर्यटनस्थळामध्ये रूपांतर केले जाणार होते. या ठिकाणी ॲम्फी थिएटर, फूड कोर्ट, टेहळणी बुरूज, पार्किंग, सुसज्ज आसनव्यवस्था, विरंगुळा केंद्र, ऑडीओ व्हिडीओ व चित्र रूपाने किल्याचा इतिहास सांगणारी यंत्रणा उपलब्ध करून दिली जाणार होती.