नवी मुंबई मेट्रोकरिता विजेची स्वतंत्र व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:59 IST2017-07-31T00:59:43+5:302017-07-31T00:59:50+5:30
बेलापूर ते पेंधर दरम्यान नवी मुंबई मेट्रो पुढील वर्षी धावणार असून, प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे.

नवी मुंबई मेट्रोकरिता विजेची स्वतंत्र व्यवस्था
अरुणकुमार मेहत्रे ।
कळंबोली : बेलापूर ते पेंधर दरम्यान नवी मुंबई मेट्रो पुढील वर्षी धावणार असून, प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. सिग्नल, टेलिकम्युनिकेशन, रोलिंग आणि आॅटो फेअर ही कामे अंतिम टप्प्यात असून, मेट्रोचे काही डबे चार महिन्यांपूर्वीच कारशेडमध्ये दाखल झाले आहेत. मेट्रोकरिता लागणाºया विजेची तरतूद करण्याचे काम महापारेषण कंपनीने हाती घेतले आहे. यासाठी खारघर सबस्टेशनमध्ये स्वतंत्र रोहित्र बसविण्याचे काम सुरू आहे.
सिडकोने मे २०११मध्ये साडेचार हजार कोटी रु पये खर्चाच्या नवी मुंबई मेट्रोच्या कामाला सुरुवात केली. खरे तर हा प्रकल्प आतापर्यंत पूर्णत्वास येणे अपेक्षित होते; परंतु तांत्रिक अडचणींमुळे मेट्रो वेळेत धावली नाही. तळोजा पाचनंद येथील मेट्रोसाठी लागणाºया उड्डाणपुलाला मध्य रेल्वेकडून परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे गेली काही वर्षे कामाची गती मंदावली होती. सिडकोने आता या ठिकाणी पूल बांधण्याचे काम हाती घेतले आहे. मेट्रो मार्गाच्या खालून दिवा-पनवेल आणि मेल गाड्यांचा मार्ग आहे. हा उड्डाणपूल झाल्यानंतर जवळपास सर्व अडथळे दूर होणार आहेत.
नवी मुंबई मेट्रो हा सिडकोचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. एकूण ११ स्थानके या मार्गावर बांधण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर एका वेळी १४०० प्रवासी वाहतूक क्षमता असणार आहे, तसे नियोजन करण्यात आले आहे. तासी ८० कि.मी. नवी मुंबई मेट्रो धावणार असल्याने त्यानुसार यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. मेट्रोकरिता आवश्यक विजेसाठी महापारेषण कंपनीकडे प्रस्ताव आधीच सादर करण्यात आला असून, त्याकरिता लागणारा निधी सिडकोने उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार खारघर येथील महापारेषणच्या सबस्टेशनमध्ये ५० एमव्ही क्षमतेचे ट्रान्सफार्मर उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ४००/२२० के. व्ही. क्षमता असणाºया या सबस्टेशनमधून ९४५ एमव्ही वीज पुरवली जाते. येथे आधीच दोन ट्रान्सफार्मर आहेत. आता आणखी ५० एमएव्हीचा ट्रान्सफार्मर बसविण्यात येणार आहे. लवकरच हे काम पूर्णत्वास येणार आहे. येथून मेट्रो रेल्वेकरिता वीज दिली जाणार
आहे. याशिवाय आगामी काळात सिडकोचे जे गृहनिर्माण प्रकल्प उभे राहतील, त्यांनाही येथूनच वीज दिली जाणार आहे.