गणेशोत्सव मंडळाबाहेर नमाज
By Admin | Updated: September 26, 2015 01:17 IST2015-09-26T01:17:51+5:302015-09-26T01:17:51+5:30
कोपरखैरणे सेक्टर १० मधील श्री गणेश मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाच्या आवारामध्ये शुक्रवारी मुसलमान बांधवांनी बकरी ईदची नमाज अदा केली

गणेशोत्सव मंडळाबाहेर नमाज
नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर १० मधील श्री गणेश मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाच्या आवारामध्ये शुक्रवारी मुसलमान बांधवांनी बकरी ईदची नमाज अदा केली. गणेश मंडळाचे कार्यकर्ते व मुस्लीम बांधवांनी सामाजिक सलोखा व एकात्मतेचा आदर्श निर्माण केला.
यावेळी गणेशोत्सव व बकरी ईद एकाच वेळी आली आहे. यावेळी शहरात अनेक ठिकाणी मुस्लीम बांधवांनी सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये सहभाग घेतला होता. शुक्रवारी ईदनिमित्त नमाज अदा करण्यासाठी कोपरखैरणे सेक्टर १० मधील मुस्लीम बांधवांना योग्य जागा उपलब्ध होत नव्हती. त्यावेळी कोपरखैरणे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी श्री गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष वैभव नाईक व मुस्लीम समाजातील नागरिकांची समन्वय बैठक घेतली व गणेश मंडळाच्या बाहेरील जागेवर नमाज अदा करावी असे आवाहन केले.
सामाजिक सलोखा व एकात्मतेचे दर्शन घडविण्यासाठी सर्वांनी यास सहमती दिली. सकाळी गणेशोत्सव मंडळाच्या बाहेर नमाज अदा करण्यात आली. या उपक्रमाचे शहरातील सर्व नागरिकांनी स्वागत केले आहे.
कोपरखैरणेमध्ये राबविण्यात आलेला हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया यावेळी अनेकांनी व्यक्त केली आहे. ईद निमित्त शहरात सर्व मुस्लीम बांधवांनी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून कुठेही रोडवर नमाज अदा केली नाही.
एपीएमसीमध्येही रोडऐवजी लिलावगृहामध्ये नमाज अदा केली. पोलीस अधिकाऱ्यांनीही यासाठी गणेश मंडळ व मुस्लीम बांधवांचे आभार मानले असून सर्वांचे अभिनंदनही केले आहे.
(प्रतिनिधी)