नालेसफाईचा उडाला बोजवारा
By Admin | Updated: June 6, 2016 01:40 IST2016-06-06T01:40:35+5:302016-06-06T01:40:35+5:30
मान्सूनपूर्व कामांची डेडलाइन संपून देखील शहरातील महत्त्वाच्या नाल्यांची सफाई झालेली नसल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे नाल्यातून वाहणारे पावसाचे पाणी तुंबून पूरपरिस्थिती

नालेसफाईचा उडाला बोजवारा
सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
मान्सूनपूर्व कामांची डेडलाइन संपून देखील शहरातील महत्त्वाच्या नाल्यांची सफाई झालेली नसल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे नाल्यातून वाहणारे पावसाचे पाणी तुंबून पूरपरिस्थिती उद्भवण्याचा धोका निर्माण झालेला आहे.
यंदा देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शिवाय अपेक्षित वेळेपेक्षाही लवकर पावसाची हजेरी लागणार आहे. त्यानुसार राज्यात काही ठिकाणी दोन दिवसांपासून पावसाला सुरवात झाली असून नवी मुंबईतही पावसाच्या हलक्या सरी झाल्या आहेत. मात्र पावसाळा तोंडावर आलेला असतानाही प्रशासन सज्ज झालेले नसल्याचे पहायला मिळत आहे. मान्सूनपूर्व कामांसाठी प्रशासनाकडून ठेकेदारांना ३१ मेची अंतिम मुदत देण्यात आलेली होती. ही मुदत उलटून गेली तरीही शहरातील मुख्य नाल्यांची अद्याप सफाई झालेली नाही. त्यामध्ये एपीएमसीमधील वाशी - सानपाडा मार्गालगतच्या मुख्य नाल्यासह, घणसोली, कोपरखैरणे व नेरुळ येथील नाल्यांचा समावेश आहे. सद्य:स्थितीला या नाल्यांमधील गाळ काढणे आवश्यक असतानाही त्यामध्ये डेब्रिज व मातीचे ढीग साचले आहेत. तर काही ठिकाणी नागरिकांनी अथवा व्यावसायिकांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे नाल्याची कचराकुंडी झाल्याचे दिसत आहे. पावसाळ्यातही नाल्यांची हीच परिस्थिती राहिल्यास त्याठिकाणी पाणी तुंबून ते लगतच्या रहिवासी क्षेत्रात जाण्याची शक्यता आहे.
शहरामधून गेलेले बहुतांश नाले औद्योगिक क्षेत्रातील दूषित अथवा सांडपाणी खाडीत सोडण्यासाठी वापरले जातात, तर याच मुख्य नाल्यांमधून डोंगरावरून शहराच्या दिशेने वाहत येणाऱ्या पाण्याचा प्रवाह खाडीकडे वळवला जातो. त्यामुळे पावसाळ्यात हे नाले तुडुंब भरुन वाहत असतात. त्याकरिता प्रतिवर्षी पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांमधील गाळ काढला जातो. शिवाय पावसाळा संपेपर्यंत ठेकेदारांमार्फत नाल्यातील अडथळे हटवले जातात. मात्र यंदाचा पावसाळा तोंडावर आलेला असतानाही नाल्यांची सफाई झालेली नाही. परिणामी शहरातील अनेक विभागांमध्ये पूरपरिस्थती उद्भवण्याचा धोका आहे.
वाशी-सानपाडा मार्गालगत मार्केटच्या बाजूचा नाला पूर्णपणे बुजलेला आहे. प्रतिवर्षी पावसाळ्यात हा नाला तुडुंब भरुन वाहत असल्यामुळे लगतचा मुख्य रस्ता देखील जलमय होत असतो. त्यामुळे या नाल्यातील गाळ काढणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. परिणामी यंदाच्या पावसामुळे सदर नाल्यातील पाणी लगतच्या मार्केटमध्ये देखील घुसण्याचा धोका निर्माण झाला आहे, तर नेरुळच्या एसबीआय कॉलनीलगतच्या नाल्याच्या काँक्रीटीकरणाचे काम अद्यापही सुरू आहे. वेळीच हे काम पूर्ण न झाल्यामुळे अंतिम टप्प्यात सुरू असलेल्या घाईमुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यामुळे शहरातील मान्सूनपूर्व कामांचा आढावा प्रशासनाकडून घेतला जाणे आवश्यक आहे. पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पाहणी दौऱ्यातून मे महिन्यात पावसाळापूर्व कामांचा आढावा घेतला होता. मात्र कामाची अंतिम मुदत संपल्यानंतर आढावा घेण्यात आलेला नसल्याचे नाल्यांच्या दुरवस्थेवरून दिसून येत आहे.