नैनामुळे पोलीस आयुक्तालयाची हद्द वाढणार

By Admin | Updated: January 4, 2016 02:11 IST2016-01-04T02:11:26+5:302016-01-04T02:11:26+5:30

नैना क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संपूर्ण क्षेत्र एकाच पोलीस आयुक्तालय हद्दीत येण्याची गरज आहे. याकरिता नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून प्रयत्न सुरू आहेत.

Naina will increase the range of Police Commissioner | नैनामुळे पोलीस आयुक्तालयाची हद्द वाढणार

नैनामुळे पोलीस आयुक्तालयाची हद्द वाढणार

सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबई
नैना क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संपूर्ण क्षेत्र एकाच पोलीस आयुक्तालय हद्दीत येण्याची गरज आहे. याकरिता नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे येत्या काळात नव्या २७० गावांचा समावेश होऊन पोलीस आयुक्तालयाची हद्द सुमारे ६०० चौ.कि.मी.ने वाढणार आहे.
नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्राच्या (नैना) विकासावर सिडकोने भर दिला आहे. टप्प्याटप्प्याने होणाऱ्या तिथल्या विकासकामांवर पहिल्या टप्प्यात सुमारे ७,५०० कोटी रुपये सिडको खर्च करणार आहे. त्यामुळे भविष्याचा वेध घेत अनेकांनी या क्षेत्राकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे नैना क्षेत्रात येत्या काळात सिडकोच्या प्रकल्पांसह अनेक खासगी प्रकल्पांसह उद्योग-व्यवसायही निर्माण होणार आहेत. तर वाढत्या विकासाबरोबरच गुन्हेगारीदेखील डोके वर काढण्याची शक्यता आहे. विकासकामे पूर्ण होताच तिथल्या पर्यटन व धार्मिकस्थळांना भेटी देणाऱ्यांमुळे वाहतुकीची समस्याही वाढण्याची शक्यता आहेत. शिवाय भूसंपादनाला स्थानिकांचा विरोध असल्याने येत्या काळात प्रकल्पग्रस्तांचे मोर्चे व आंदोलने निघण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा अनेक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी संपूर्ण नैना क्षेत्र एकाच पोलीस आयुक्तालय क्षेत्रात येणे गरजेचे आहे.
ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या सुमारे ६०० चौ.कि.मी. क्षेत्रफळात नैना क्षेत्र विस्तारलेले आहे. त्यामध्ये
रायगड जिल्ह्यातील उरण, कर्जत, खालापूर, पेण व पनवेल या तालुक्यांमधील २५६ गावांचा, तर ठाणे जिल्ह्यातील १४ गावांचा नैना क्षेत्रात समावेश झाला आहे. त्यापैकी १११ गावे अवघ्या पनवेल तालुक्याची आहेत. सद्य:स्थितीत पनवेल तालुक्याचा बहुतांश भाग नवी मुंबई पोलिसांच्या कार्यक्षेत्रात असल्याने उर्वरित भागालाही समाविष्ट करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे अन्यथा कायदा व सुव्यवस्था राखताना पोलीसही हद्दीच्या वादात पडण्याची शक्यता आहे.
भविष्यातल्या अशा समस्या टाळण्यासाठी संपूर्ण नैना क्षेत्र
एकाच आयुक्तालयात येण्याची गरज आहे. यासाठी आयुक्तालयामार्फत प्रयत्न सुरू असून लवकरच त्यासंबंधीचा अहवाल शासनाकडे पाठवला जाणार आहे. नैना क्षेत्रातील पनवेल तालुक्याची गावे वगळता इतर गावे रायगड व ठाणे पोलिसांच्या हद्दीतली आहेत. सद्य:स्थितीत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे द्य
कार्यक्षेत्र ९५३ चौ.कि. मी. इतके आहे. त्यात नैना क्षेत्राची भर पडल्यास सुमारे ६०० चौ.कि.मी. क्षेत्रफळ वाढणार आहे.

Web Title: Naina will increase the range of Police Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.