नाईक समर्थकांनी लावला महापालिकेला चुना
By Admin | Updated: September 17, 2015 00:05 IST2015-09-17T00:05:07+5:302015-09-17T00:05:07+5:30
ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँगे्रसच्या कार्यकर्त्यांनी पालिकेची परवानगी न घेता एक हजारपेक्षा जास्त होर्डिंग लावले होते.

नाईक समर्थकांनी लावला महापालिकेला चुना
नवी मुंबई : ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँगे्रसच्या कार्यकर्त्यांनी पालिकेची परवानगी न घेता एक हजारपेक्षा जास्त होर्डिंग लावले होते. पालिका आर्थिक संकटात असताना सत्ताधारी पक्षानेच फुकटची जाहिरातबाजी करून हजारो रुपयांचा महसूल बुडविल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शासनाने एलबीटी रद्द केल्यामुळे महापालिकेचा उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत बंद झाला आहे. उत्पन्न कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम विकासकामांवर होवू लागला आहे. मंजूर केलेली अनेक कामे थांबविण्यात आली आहेत. मोठे प्रकल्प पुढील वर्षभरात न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेत सत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँगे्रसने आर्थिक स्थितीवर चर्चा करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. यामध्ये जाहिरात व परवाना विभागाचे कामकाज चांगल्या पद्धतीने केले तर उत्पन्नात वाढ होवू शकते असे मत नगरसेवकांनी व्यक्त केले होते. परंतु सभागृहात चर्चा करणारे लोकप्रतिनिधीच मात्र प्रत्यक्षात विनापरवाना होर्डिंग लावून शहर विद्रूप करत असून पालिकेचा महसूलही बुडवत आहेत. यामध्ये सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा १५ सप्टेंबरला वाढदिवस असल्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रत्येक प्रभागात १० ते २० होर्डिंग लावले होते. यामधील ८० टक्के होर्डिंगला परवानगीच घेण्यात आली नव्हती. विनापरवाना होर्डिंग लावल्यामुळे महापालिकेचा महसूल बुडाला आहे. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच पालिकेचे नुकसान करत असल्यामुळे इतर पक्षांचे पदाधिकारीही विनापरवाना होर्डिंग लावत आहेत.
नाईक यांनी स्वत: होर्डिंगबाजी करू नका. पुष्पगुच्छ देवू नका, दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले असताना कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त स्वत:ची जाहिरात करून घेतली असून शहरवासीयांनी मात्र याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)