अस्तित्व टिकविण्यासाठी नाईक रस्त्यावर
By Admin | Updated: March 11, 2017 02:28 IST2017-03-11T02:28:22+5:302017-03-11T02:28:22+5:30
सत्ता असूनही स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न का नाही सोडवला, असा सवाल करून केवळ नैराश्यापोटी स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात

अस्तित्व टिकविण्यासाठी नाईक रस्त्यावर
नवी मुंबई : सत्ता असूनही स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न का नाही सोडवला, असा सवाल करून केवळ नैराश्यापोटी स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचा आरोप बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना केला. या वेळी बोलताना म्हात्रे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गुरुवारी झालेल्या बैठकीत नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्त यांची २०१५ पूर्वीची गरजेपोटी बांधलेली घरे कायम करण्याचा निर्णय घेतला. तुर्भे येथील डम्पिंग ग्राउंड हलवणे या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली असून सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत झुणका भाकर केंद्र पूर्ववत ठेवणे, धोकादायक इमारतींचे पुनर्निर्माण आदी महत्त्वाचे प्रश्न निकाली काढण्यात आल्याचेही म्हात्रे यांनी स्पष्ट केले. सिडकोने जेव्हा अतिक्रमणाची पहिली मोहीम हाती घेतली तेव्हा गावठाणातील प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर पहिला हातोडा पडला, त्या वेळी हे नेते कुठे होते असा सवाल आ. मंदा म्हात्रे यांनी उपस्थित केला. शुक्रवारी झालेल्या निर्धार मोर्चात प्रकल्पग्रस्त नागरिकांचा सहभाग नव्हता, अशीही टीका या वेळी करण्यात आली. नवी मुंबईतील सिडको घरे फ्री होल्ड करणे, प्रकल्पग्रस्त, तुर्भे डम्पिंग ग्राउंड, सिडको विद्यावेतन आदी प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांना साकडे घातले असून मुख्यमंत्री याबाबत सकारात्मक निर्णय घेतील, असा विश्वास आमदार म्हात्रे यांनी व्यक्त केला. लोकप्रतिनिधीच्या झोपड्यांवर कारवाई का केली जाते? या वेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, दीपक पवार, डॉ. राजेश पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
तुर्भेतील डम्पिंगचा प्रश्न मार्गी
येत्या आठवडाभरात तुर्भे डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न निकाली लावणार असल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली. विटावा कळवा येथील गणपती पाडा मंदिराच्या मागे आणि बोनसरी अशा पर्यायी दोन जागांबाबत विचार केला जाणार आहे.
वैभव नाईकांना पक्षाचे आमंत्रण नाही
कोणत्याही कार्यक्रमाला, सभेला उपस्थित राहत नसल्याने पक्षाने वैभव नाईक यांना कोणत्याही कार्यक्रमाला न बोलाविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती नगरसेवक रामचंद्र घरत यांनी दिली. पक्षाचा कोणताही कार्यक्रम अथवा सभेविषयी त्यांना कळविले जाणार नाही, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.