‘नाला व्हिजन’साठी ७०० कोटींचा निधी अपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:06 IST2017-07-31T01:06:21+5:302017-07-31T01:06:21+5:30

शहरातील मोठ्या नाल्यांचा जेएनएनयूआरएमअंतर्गत एकत्रित विकास करण्याची योजना बारगळली आहे. केंद्र सरकारने पालिकेचा हा प्रकल्प नाकारला आहे.

naalaa-vahaijanasaathai-700-kaotaincaa-naidhai-apaekasaita | ‘नाला व्हिजन’साठी ७०० कोटींचा निधी अपेक्षित

‘नाला व्हिजन’साठी ७०० कोटींचा निधी अपेक्षित

नामदेव मोरे ।
नवी मुंबई : शहरातील मोठ्या नाल्यांचा जेएनएनयूआरएमअंतर्गत एकत्रित विकास करण्याची योजना बारगळली आहे. केंद्र सरकारने पालिकेचा हा प्रकल्प नाकारला आहे. ७४ किलोमीटर लांबीच्या नाल्यांचा विकास करण्यासाठी तब्बल ७०० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. निधीअभावी एकत्रित विकास न करता प्राधान्यक्रम ठरवून नाल्यांची डागडुजी करावी लागणार आहे.
दिघा ते बेलापूरपर्यंत पसरलेल्या डोंगररांगांवरून येणारे पावसाचे पाणी दहा प्रमुख व २९ उपनाल्यांमधून खाडीकडे जाते. शहरात ७४ किलोमीटर लांबीचे नैसर्गिक नाले आहेत. दिघा, चिंचपाडा, विष्णूनगर, इंदिरानगर, नेरूळ,राबाडा व इतर अनेक ठिकाणी नाल्याच्या कडेला लोकवस्ती झाली आहे. २६ जुलै २००५ च्या अतिवृष्टीमध्ये नाल्यांमधील पाणी वस्तीमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली होती. १२ वर्षांपासून सर्वपक्षीय नगरसेवक नाल्यांना संरक्षण भिंत बांधण्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा करत आहेत. नागरिक व सामाजिक कार्यकर्तेही याविषयी वारंवार पाठपुरावा करत आहेत. परंतु महापालिका प्रशासनातर्फे जेएनएनयूआरएमअंतर्गत एकत्रित नाला व्हिजन राबविण्यात येणार आहे. याविषयी केंद्र शासनाला प्रस्ताव दिला असून त्याला मंजुरी दिल्यानंतर संरक्षण भिंत व सुशोभीकरणाची कामे केली जाणार असल्याचे आश्वासन दिले होते. केंद्र शासनाला याविषयी आराखडाही सादर करण्यात आला होता. स्थायी समिती, प्रभाग समिती व सर्वसाधारण सभेमध्ये याविषयी नगरसेवकांनी आवाज उठविला की जेएनएनयूआरएमचे नाव सांगून सर्वांना गप्प करण्यात येत होते. परंतु जुलै महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये बहादूर बिष्ट यांनी चिंचपाडा येथील नाल्याला संरक्षण भिंत बांधली नाही तर अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तत्काळ याविषयी कार्यवाही करण्याची मागणी केली होती. शहर अभियंता मोहन डगावकर यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, जेएनएनयूआरएमअंतर्गत दिलेला प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. यामुळे भविष्यात गरज पाहून व अर्थसंकल्पातील तरतुदीप्रमाणे कामे करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
औद्योगिक वसाहतीमधील येणाºया नैसर्गिक नाल्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. अनेक ठिकाणी उद्योजकांनी त्यांच्या सुविधेसाठी नाल्यांचा प्रवाह बदलला आहे. नाल्यांमध्ये डेब्रिज टाकून त्यांचा आकार कमी करण्याचे षड्यंत्र सुरू झाले आहे. नाल्याला लागून झोपड्यांचे बांधकाम झाले आहे. या सर्र्वांमुळे मोठ्या नाल्यांचा आकार कमी होत आहे. शहरामध्ये पुन्हा अतिवृष्टी झाल्यास चिंचपाडासह इतर अनेक ठिकाणी लोकवस्तीमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मोठी दुर्घटना होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली असून प्रशासनाने आवश्यकतेप्रमाणे नाल्यांना संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू करावे, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: naalaa-vahaijanasaathai-700-kaotaincaa-naidhai-apaekasaita

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.