नेरूळमध्ये मुस्लिमांची भव्य रॅली

By Admin | Updated: February 25, 2016 04:16 IST2016-02-25T04:16:21+5:302016-02-25T04:16:21+5:30

पोलिसांनी आयोजित केलेल्या दहशतवादविरोधी अभियानाला पाठिंबा दर्शवत मुस्लीम बांधवांच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नेरुळ येथे निघालेल्या या

Muslim rally in Nerul | नेरूळमध्ये मुस्लिमांची भव्य रॅली

नेरूळमध्ये मुस्लिमांची भव्य रॅली

नवी मुंबई : पोलिसांनी आयोजित केलेल्या दहशतवादविरोधी अभियानाला पाठिंबा दर्शवत मुस्लीम बांधवांच्या वतीने भव्य
रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नेरुळ येथे निघालेल्या या
रॅलीमध्ये सुमारे पाच हजार मुस्लीम बांधव, महिला व विद्यार्थी सहभागी झाले होते.
भारतावर आजवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा सहभाग असल्याचे दिसून आलेले आहे. यामुळे मुस्लीम समाजाकडे पाहण्याचा भारतवासीयांचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. परंतु भारतात राहणारे मुस्लीम हे देखील मनाने भारतीय असून इतरांप्रमाणेच त्यांनाही भारत प्रिय आहे.
यामुळे दहशतवादाशी भारतातील प्रत्येक मुस्लीम व्यक्तीचा संबंध जोडल्याने त्यांच्याही भावना दुखावल्या जातात. परंतु जरी धर्माने मुस्लीम असलो तरी आमचाही दहशतवादाला तीव्र विरोध आहे हे नवी मुंबईतील मुस्लीम बांधवांनी दाखवून दिले आहे.
परिमंडळ १ पोलिसांच्या वतीने दहशतवादविरोधी सप्ताह साजरा होत आहे. या निमित्ताने नेरुळ पोलिसांच्या सहयोगातून दहशतवाद विरोधी मुस्लीम रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रतिष्ठित मुस्लीम बांधवांसह ५ हजारहून अधिक पुरुष, महिला व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
या प्रत्येकाकडून दहशतवादाला धर्म नाही, दहशतवाद थांबवा- देश वाचवा अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जात होत्या. या रॅलीची सांगता डी.वाय. पाटील सभागृहात करण्यात आली.
याप्रसंगी पोलीस
आयुक्त प्रभात रंजन, उपआयुक्त सुरेश मेंगडे, शहाजी उमाप, इमलराज, अलीमियॉ शमसो, आलम बाबा यांच्यासह सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

वाशी येथे दहशतवादावर सावधानता हीच गुरुकिल्ली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास रिक्षा, टॅक्सी, टेंपो चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपस्थितांना उपआयुक्त शहाजी उमाप, आरटीओ अधिकारी संजय धायगुडे, निवृत्त सहाय्यक आयुक्त धनराज वंजारी यांनी मार्गदर्शन केले.
चित्रपटगृहे, हॉस्पिटल, रुग्णवाहिका, मॉल यांच्या प्रतिनिधींची बैठक घेवून त्यांना आपत्ती व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमास उपआयुक्त प्रशांत खैरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजेंद्र लोखंडे आदी उपस्थित होते.
पोलिसांसाठी देखील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. गुन्ह्यांचा तपास कसा करावा, पुरावे कसे जमवावे अशा विविध विषयांवर निवृत्त सहाय्यक आयुक्त ताजणे यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले.

Web Title: Muslim rally in Nerul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.