पालिका शाळांची शोकांतिका
By Admin | Updated: February 2, 2016 02:12 IST2016-02-02T02:12:31+5:302016-02-02T02:12:31+5:30
नवी मुंबईमधील झोपडपट्टी परिसरातील शाळांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पत्र्याचे शेड, समाजमंदिर व झोपडीमध्ये तीन शाळा भरविण्यात येत असून त्यामध्ये २२०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत

पालिका शाळांची शोकांतिका
नामदेव मोरे, नवी मुंबई
नवी मुंबईमधील झोपडपट्टी परिसरातील शाळांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पत्र्याचे शेड, समाजमंदिर व झोपडीमध्ये तीन शाळा भरविण्यात येत असून त्यामध्ये २२०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एका शाळेत विद्यार्थ्यांना शौचालयही नसून इतर दोन शाळांमध्ये प्रत्येकी एकच शौचालय आहे. बसण्यासाठी पुरेशी जागाही नसून शाळांचे कोंडवाडे झाले असतानाही प्रशासन या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देत नाही.
नवी मुंबई महानगरपालिकेने स्कूल व्हिजनच्या माध्यमातून जिल्हा परिषद काळातील जुन्या इमारती पाडून बहुमजली इमारती उभ्या केल्या आहेत. परंतु या शाळा सिडको नोड व गावठाण परिसरात झाल्या आहेत. तुर्भे स्टोअर व राबाडा झोपडपट्टी वगळता इतर झोपडपट्ट्यांमधील शाळांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. सर्वात गंभीर स्थिती यादवनगरमधील हिंदी माध्यमाच्या शाळा क्रमांक ७७ ची झाली आहे. पहिली ते आठवीपर्यंत तब्बल १८०० विद्यार्थी या शाळेमध्ये आहेत. वाहने उभी करण्यासाठी तयार केलेल्या शेडमध्ये शाळा भरविण्यात आली आहे. पावसाळ्यात वर्गात पाणी साचते. उन्हाळ्यात पत्र्यामुळे प्रचंड उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागल्याने माजी नगरसेवक रामअशिष यादव यांच्या कार्यालयात शाळा भरविली जात आहे. दोन ठिकाणी शाळा भरत असून १८०० विद्यार्थ्यांसाठी एकच शौचालय आहे. शाळेमध्ये वीजपुरवठाही लोकप्रतिनिधींनीच उपलब्ध करून दिला आहे. मनपा प्रशासन एमआयडीसीकडून जागा देत नसल्याचे कारण सांगून जबाबदारी झटकत आहे.
यादवनगरपासून काही अंतरावर सुभाषनगरमध्ये पालिकेची शाळा क्रमांक ७९ आहे. रोडला लागून एक झोपडी व समाजमंदिरात शाळा भरत आहे. पाचवीपर्यंतचे वर्ग अपुऱ्या जागेत बसविले जात आहेत. याशिवाय बालवाडी व खेळवाडीही याच ठिकाणी सुरू आहे. जवळपास २०० विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांच्यासाठी फक्त एकच शौचालय आहे. शौचालयाला लागून एक नळजोडणी आहे. शौचालय व पिण्यासाठी त्याच ठिकाणावरून पाणी घ्यावे लागत आहे. अशीच स्थिती इलठाणपाडा शाळा क्रमांक ५६ मध्ये आहे. येथे समाजमंदिर व बाजूच्या खोलीत शाळा भरते. वर्गखोल्या पुरेशा नसल्याने त्यांची गैरसोय होत असून प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही.
स्वच्छतेचा पुरस्कार कसा मिळाला ?
महापालिकेला संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानामध्ये दोन वेळा प्रथम क्रमांक मिळाला आहे. परंतु वास्तवामध्ये महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शौचालयही नाही. विद्यार्थिनी व शिक्षिकांचीही प्रचंड गैरसोय होत असून या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे. विद्यार्थी व शिक्षकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गरीब वस्तीमधील शाळांची दुरवस्था झाली असताना मनपाला स्वच्छतेसाठीचा पुरस्कार मिळालाच कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एमआयडीसीच्या जागेवर ५० हजारपेक्षा जास्त झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. शहरामध्ये तबेल्यांसाठीही फुकटची जागा दिली असून त्यांच्यावर कधीच कारवाई झालेली नाही. परंतु शाळेसाठी जागा मागितल्यास एमआयडीसी प्रशासन शाळेसाठी जागा देता येत नसल्याचे कारण सांगत आहे. यादवनगरमधील शाळेसाठी जागा देण्याचे निश्चित केले. परंतु वर्षाला १ कोटीपेक्षा जास्त भाडे आकारले होते. भूमाफियांनी बिनधास्तपणे अतिक्रमण केले तरी चालते परंतु महापालिकेने गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जागा मागितली तर दिली जात नसल्याबद्दल स्थानिक लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.