दहा रुग्णालयांना महापालिकेची नोटीस; बिलांच्या आकड्यात आढळली विसंगती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 00:02 IST2020-08-13T00:02:41+5:302020-08-13T00:02:52+5:30
नवी मुंबई : रुग्णांची लुबाडणूक करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. बिलांमध्ये प्रथमदर्शी ...

दहा रुग्णालयांना महापालिकेची नोटीस; बिलांच्या आकड्यात आढळली विसंगती
नवी मुंबई : रुग्णांची लुबाडणूक करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. बिलांमध्ये प्रथमदर्शी विसंगती आढळलेल्या दहा रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यापुढेही कोणी नियमापेक्षा जास्त बिल आकारले, तर महानगरपालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
कोरोना रुग्णांवर त्यांच्या लक्षणांस अनुरूप योग्य प्रकारे उपचार केले जावेत. त्या उपचारांसाठी खासगी रुग्णालयांकडून शासन अधिसूचनेनुसार प्रत्येक बाबीसाठी निश्चित केलेले वाजवी शुल्क आकारले जावे, याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी जारी केले आहेत. यात वैद्यकीय उपचार, सुविधा व देयक अशा सर्व बाबींवर मार्गदर्शक सूचना दिल्या असून, रुग्णालयनिहाय नियुक्त केलेल्या महानगरपालिकेच्या नोडल अधिकारी यांनी त्याबाबतच्या अंमलबजावणीवर काटेकोर लक्ष ठेवण्याचे निर्देशित करण्यात आले आहे, परंतु काही खासगी रुग्णालयांकडून रुग्णांवरील उपचाराची अवाजवी आकारणी केली जात असल्याच्या तक्रारी नवी मुंबई महानगरपालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या.
प्राप्त तक्रारींची दखल
तक्रारींच्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत रुग्णालय देयकांबाबतच्या विशेष लेखा परीक्षण पडताळणी समितीच्या वतीने या देयकांच्या पडताळणीमध्ये प्रथमदर्शनी दोष आढळलेल्या १0 खासगी रुग्णालयांना पालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावल्या.