Municipal hospital support for noncovid patients | नॉनकोविड रुग्णांना पालिका रुग्णालयाचा आधार

नॉनकोविड रुग्णांना पालिका रुग्णालयाचा आधार


लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुुंबई : कोरोनाच्या पहिल्या लाटेत मनपाचे प्रथम संदर्भ रुग्णालय बंद असल्यामुळे नॉनकोविड रुग्णांची प्रचंड गैरसोय झाली होती; परंतु सद्य:स्थितीमध्ये प्रथम संदर्भ रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू असल्याने कोरोनाव्यतिरिक्त आजार असणाऱ्यांना उपचार देता येत आहेत. याशिवाय खासगी रुग्णालयांचाही पुरेसा पर्याय उपलब्ध आहे. 
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य विभागावरील ताण वाढत आहे. पहिल्या लाटेत अनेक खासगी रुग्णालये बंद होती. मनपाच्या प्रथम संदर्भ रुग्णालयाचेही डेडिकेटेड कोविड रुग्णालयात रूपांतर केले होते. सद्य:स्थितीमध्ये रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू आहे. तर, २९ खासगी कोविड वगळता इतर खासगी हॉस्पिटल सुरू असल्याने आरोग्य सुविधा देणे शक्य होत आहे. भविष्यात रुग्ण वाढले तरी गंभीर अजार वगळता इतर शस्त्रक्रिया थांबविण्याची शक्यता आहे.

परत जावे लागत नाही
शहरातील कोरोनाव्यतिरिक्त आजारांसाठी वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात ३०० बेडची सोय आहे. तेथे २०० रुग्ण उपचार घेत आहेत. याशिवाय ओपीडीमध्ये प्रतिदिन १ हजार ते १,२०० रुग्ण उपचारासाठी येत आहेत. याशिवाय खासगी रुग्णालयेही पुरेशा प्रमाणात सुरू आहेत. यामुळे कोरोनाव्यतिरिक्त आजार असणाऱ्यांना परत जावे लागत नाही. अपवादप्रसंगी काही रुग्णालयांमध्ये जागा नसल्यास इतर रुग्णालयांत जावे लागत आहे. फारसी गैरसोय होत नाही.

सद्य:स्थितीमध्ये पुरेसी सुविधा
शहरात सद्य:स्थितीमध्ये कोरोनाव्यतिरिक्त आजारांसाठी पुरेशी सुविधा आहे. मनपा व खासगी रुग्णालये सुरू आहेत; पण कोरोना रुग्णांची वाढ सुरूच राहिली, तर भविष्यात हृदयरोग, कँसर व महत्त्वाचे अजार वगळता इतर शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची शक्यता आहे.

२९ खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे महानगरपालिकेने खासगी रुग्णालयांचाही आधार घेण्यास सुरुवात केली आहे. शहरातील २९ खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार केले जात आहेत. डॉ. डी.वाय. पाटील व एमजीएम रुग्णालयामध्ये मनपाचे रुग्णही संदर्भित केले जात आहेत. आयसीयू व व्हेंटिलेटर्ससाठी खासगी रुग्णालयांचा आधार घेतला जात आहे. अनेक प्रमुख रुग्णालयांमध्ये कोरोनाबरोबर इतर आजारांवरही उपचार केले जात आहेत.

Web Title: Municipal hospital support for noncovid patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.