वडाळे तलावाजवळील घर पालिकेने तोडले
By Admin | Updated: January 12, 2017 06:26 IST2017-01-12T06:26:00+5:302017-01-12T06:26:00+5:30
पनवेल महापालिकेच्या वडाळे तलावात गेली कित्येक वर्षे बांधलेले घर पालिकेच्या अतिक्र मण विभागाने बुधवारी जमीनदोस्त केले.

वडाळे तलावाजवळील घर पालिकेने तोडले
पनवेल : पनवेल महापालिकेच्या वडाळे तलावात गेली कित्येक वर्षे बांधलेले घर पालिकेच्या अतिक्र मण विभागाने बुधवारी जमीनदोस्त केले. मात्र, तलावाच्या आतील भागात असणारे हे घर पाडण्यात आले, तर तलावाच्या आजूबाजूला जवळपास ३०हून अधिक ठिकाणी अतिक्र मण करण्यात आले आहे. मात्र, त्यांच्यावर पालिका कारवाई करत नसल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.
पनवेलच्या वडाळे तलावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. येथे १९८६मध्ये घर बांधले असल्याचे दत्तात्रेय गायकर यांचे म्हणणे आहे. तसेच या घराचे १२० रु पये घरभाडे देखील भरत असल्याचे गायकर यांनी सांगितले. या तलावाचा भाडेपट्टा ४ हजार २०० रु पये असून, पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केवळ सूडबुद्धीने ही कारवाई केली असल्याचा आरोप या वेळी गायकर कुटुंबीयांकडून करण्यात आला. आम्ही या तलावात हजारो मासे सोडले आहेत. त्यामुळे होणारे नुकसान लाखोंच्या घरात आहे. पालिकेने आमचे राहते घर तोडल्याने आमचे पुनर्वसन करावे व आम्हाला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी दत्तात्रेय गायकर यांनी केली आहे. या वेळी बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी व पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता. वडाळे तलावातील घर तोडण्यासाठी जेसीबी आणताना येथील चार ते पाच झाडेही जेसीबीने तोडून टाकली. त्यामुळे पालिका एकीकडे वृक्ष लावा, वृक्ष जगवा असा सामाजिक संदेश देते आणि दुसरीकडे अतिक्र मणाची कारवाई करताना झाडांचे नुकसान करते. त्यामुळे ही झाडे तोडल्याबद्दल आयुक्तांना कारवाई करण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)