फिफा स्पर्धेकरिता महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा
By Admin | Updated: July 17, 2017 01:29 IST2017-07-17T01:29:10+5:302017-07-17T01:29:10+5:30
आंतरराष्ट्रीय फिफा वर्ल्ड कप स्पर्धा या पहिल्यांदा भारतात खेळल्या जाणार असून त्याकरिता नवी मुंबईतील नेरुळ येथील डी.वाय. पाटील

फिफा स्पर्धेकरिता महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय फिफा वर्ल्ड कप स्पर्धा या पहिल्यांदा भारतात खेळल्या जाणार असून त्याकरिता नवी मुंबईतील नेरुळ येथील डी.वाय. पाटील क्रीडा संकुलाची निवड करण्यात आली आहे. विविध देशातील १७ वर्षांखालील फुटबॉल खेळाडू याठिकाणी येणार असून आॅक्टोबर महिन्यात या स्पर्धेला सुरुवात होत आहे. खेळाडूंच्या सरावासाठी महानगरपालिकेचे नेरूळ, सेक्टर १९ येथील यशवंतराव चव्हाण क्रीडांगण विशेष मैदान म्हणून तयार केले जात असून शनिवारी आयुक्तांनी पूर्वतयारीचा आढावा घेतला.
जगभरातून हे सामने बघण्यासाठी येणाऱ्या फुटबॉलप्रेमींचे स्वागत करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली असून महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी शहरातील प्रवेशाची ठिकाणे, मुख्य चौक, वाहतूक बेटांचे सुशोभीकरण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, शहर अभियंता मोहन डगांवकर तसेच संबंधित विभागप्रमुख त्याचप्रमाणे डी.वाय.पाटील स्टेडियम, वाहतूक पोलीस विभाग, नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन,एम.जी.एम. रूग्णालय वाशी यांचे उच्च अधिकारी उपस्थित होते.
२४ मेला या मैदानाला प्रत्यक्ष भेट देण्यात आली होती. अशाच प्रकारे सराव वाशी येथील एन.एम.एस.ए. मैदान तसेच डी.वाय.पाटील विद्यापीठ मैदान याठिकाणी सराव होणार असून त्याचीही माहिती आयुक्तांनी घेतली व महानगरपालिकेकडून स्पर्धेच्या कामाकरिता सहकार्य केले जाणार असल्याची सकारात्मक भूमिका यावेळी स्पष्ट करण्यात आली.
सराव मैदानांच्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण क्रीडांगणाच्या ठिकाणी नेरूळ, वाशी, बेलापूर अग्निशमन केंद्रामार्फत अग्निशमन वाहने व अग्निशमन जवान तैनात असतील, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.