विनानिविदा सुरू आहे महापालिकेचे कँटीन
By Admin | Updated: August 31, 2015 03:28 IST2015-08-31T03:28:23+5:302015-08-31T03:28:23+5:30
महापालिकेचे नवीन मुख्यालय सुरू होवून दीड वर्ष झाले तरी अद्याप कँटीनची निविदा काढलेली नाही. जुन्याच ठेकेदाराला हे काम दिले आहे.

विनानिविदा सुरू आहे महापालिकेचे कँटीन
नवी मुंबई : महापालिकेचे नवीन मुख्यालय सुरू होवून दीड वर्ष झाले तरी अद्याप कँटीनची निविदा काढलेली नाही. जुन्याच ठेकेदाराला हे काम दिले आहे. कँटीनमध्ये वस्तूंचे दरपत्रकही लावण्यात आलेले नसून, कर्मचारी अपुरे असल्यामुळे गर्दीच्या वेळी येथे येणाऱ्यांची गैरसोय होत आहे.
नवी मुंबई महापालिकेने पामबीच रोडवर जवळपास २०० कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक मुख्यालय बांधले आहे. याठिकाणी कर्मचारी व कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी विस्तीर्ण कँटीन तयार केले आहे. कर्मचारी, अधिकारी, नगरसेवक व नागरिकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केली आहे. कर्मचाऱ्यांना कार्यालयात जेवण किंवा अन्नपदार्थ खाण्यास परवानगी नाही. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना दुपारी जेवण करण्यासाठी किंवा चहा, नाष्टा करण्यासाठी कँटीनमध्येच यावे लागते. पालिकेत कामानिमित्त अनेक नागरिक येत असतात. येथे बसण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागा असल्यामुळे अनेक नागरिक व्यावसायिक बैठकाही येथेच करू लागले आहेत. दुपारी जेवणाच्या वेळेला कँटीनमध्ये प्रचंड गर्दी असते. परंतु कँटीन चालविणाऱ्या ठेकेदाराकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे त्यांचा गोंधळ उडत आहे. नागरिकांना खाद्यपदार्थ घेण्यासाठी अर्धा ते एक तास वाट पहावी लागते.
पालिकेने नवीन मुख्यालयामधील कँटीनसाठी अद्याप निविदा मागविल्या नाहीत. निविदा न मागविताच जुन्या मुख्यालयातील कँटीन चालकास ठेका दिला आहे. जुन्या मुख्यालयात कँटीनचा आकार लहान होता व तेथे जाणाऱ्यांची संख्याही कमी होती. परंतु नवीन मुख्यालयामध्ये सर्वांना कँटीनमध्येच जेवण करणे बंधनकारक आहे. यामुळे येथे दुपारी प्रचंड गर्दी होत असते. या ठेकेदाराने कोणत्या वस्तू मिळणार याचे दरपत्रकही लावलेले नाही.
नागरिकांना वेळेत खाद्यपदार्थ मिळत नाहीत. सिडको, कोकण भवनच्या कँटीनच्या तुलनेमध्ये जेवणाचा
दर्जाही चांगला राखला जात
नाही. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होवू लागली आहे. (प्रतिनिधी)