मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
By अतुल कुलकर्णी | Updated: December 17, 2025 07:07 IST2025-12-17T07:06:35+5:302025-12-17T07:07:39+5:30
विमानतळावर स्वतःचे हँगर असल्यास आपत्कालीन स्थितीत आपली विमाने तेथे उतरवणे होणार सोपे

मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
'एनएमआयए'चे फायदे/अपेक्षा : भाग-३
अतुल कुलकर्णी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: जमीन, विमानतळ त्यासाठीचे इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्या गोष्टी सरकारने उभ्या करून दिल्या, मात्र मुंबईत टी वन आणि टी टू वर राज्य सरकारचे स्वतःचे स्टेट हँगर नाही. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तरी राज्य सरकारने स्वतःचे स्टेट हँगर घ्यावे, अशी या क्षेत्रातील तज्ज्ञांची मागणी आहे. आपल्याकडे टी वन येथे मिलेनियम टर्मिनल आहे. ठिकाणी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे विमान त्या उतरवण्यासाठी त्याचा वापर होतो. जर आपल्याकडे स्टेट हँगर असेल तर आपत्कालीन स्थितीत आपली विमाने तेथे उतरवणे सोपे जाईल.
मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार अशा अनेक राज्यांमध्ये त्यांचे स्वतःचे स्टेट हँगर आहे. शिवाय त्यांचे स्वतःचे वेगळे टर्मिनलही आहे, ज्याचा सामान्य प्रवाशांशी संपर्क येत नाही. त्या राज्यांना त्यासाठी वेगळे भाडे देण्याचीही गरज पडत नाही. आपल्याकडे मात्र सरकारला भाड्याने हँगर घ्यावे लागते. राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह खासगी, सरकारी विमानाने जाणाऱ्या सरकारमधल्या सर्व प्रमुखांना त्यासाठी भाडे द्यावे लागते. आपल्याकडे अशी व्यवस्थाच सुरुवातीपासून नसल्यामुळे पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्यासह जगभरातून येणाऱ्या पाहुण्यांचे विमान उतरवण्यासाठी विमानतळ ज्यांना चालवायला दिले आहे, त्यांच्या हँगरचा वापर करावा लागतो.
अनेकदा त्यासाठी भाडेही भरावे लागते. ज्या जागेवर विमानतळ उभारण्यात आले ती जागा राज्य शासनाच्या मालकीची. विमानतळ होण्यासाठीचे सर्व परिश्रम राज्य सरकारचे. परवानगी शासनाची. मात्र, शासनाच्या मालकीचे हँगरच नाही ही राज्यासाठी चांगली गोष्ट नाही, असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
काय म्हणतात तज्ज्ञ ?
जीव्हीकेने जेव्हा मुंबई विमानतळ घेतले तेव्हाही आपण स्टेट हँगर न घेण्याची चूक केली होती. आपल्याकडे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी जुहू विमानतळ येथे स्टेट हँगर आहे. तिथे फक्त हेलिकॉप्टरच उतरू शकते.
जनरल एव्हिएशन टर्मिनल (गेट आठ) येथे रिलायन्स, टाटा ताज, एस्सार, रेमंड यांचे हँगर आणि लाऊंज आहेत. राज्य सरकारचे मात्र असे काहीच नाही. भविष्यात असे होऊ नये यासाठी राज्य सरकारने स्वतःचे लाऊंज आणि हँगर यानिमित्ताने घेतले पाहिजे, अशी प्रतिक्रिया या क्षेत्रातील तज्ज्ञांची आहे.
"आपले स्वतःचे स्टेट हँगर असेल तर आपत्कालीन स्थितीत सरकार त्याचा वापर करू शकते. आपल्याला विमान उतरवणे किंवा तातडीने विमान नेणे यासाठी याचा फायदा होऊ शकतो. विमानतळाजवळच राज्य शासनाच्या मालकीचे स्वतःचे वेअर हाऊस असायला पाहिजे. जेणेकरून त्या ठिकाणी औषधी, धान्य आणि आपत्कालीन व्यवस्थेसाठी लागणान्या गोष्टी ठेवण्याची व्यवस्था केली पाहिजे. त्याचा फायदा कुठेही, कधीही औषधी, अन्नधान्य पोहोचविण्यासाठी होईल."
- मंदार भारदे,
एव्हिएशन क्षेत्रातील प्रमुख व्यावसायिक