नवी मुंबई : पालिकेकडून सुरु असलेल्या कारवाईच्या विरोधात फेरीवाल्यांतर्फे तुर्भे विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. परंतु अनधिकृत फेरीवाल्यांच्या आंदोलनावर आक्षेप घेवून त्यांंना परवानगी मिळू नये असे पत्र मनसेतर्फे पोलिसांना देण्यात आले होते. यामुळे मोर्चा फिसकटल्याने फेरीवाल्यांच्या शिष्टमंडळाने निवेदन देवून आंदोलन उरकले.अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईच्या मनसेच्या मागणीनुसार शहरात सिडको व पालिकेने कारवाईचा धडाका सुरु केला आहे. वर्षानुवर्षे ठाम मांडून बसलेले अनधिकृत फेरीवाले या कारवाईच्या माध्यमातून हटवले जात आहेत. त्यामुळे या कारवाईच्या विरोधात फेरीवाल्यांतर्फे तुर्भे विभाग कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला होता. परंतु अनधिकृत फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ हा मोर्चा असल्यामुळे त्यांंना परवानगी मिळू नये असे पत्र मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी पोलिसांना दिले होते. अनधिकृत फेरीवाल्यांमागे अर्थकारण असून त्यामध्ये कथित संघटनांचाही समावेश असल्याचा आरोप काळे यांनी केला होता. तसेच प्रशासनाने अशा हप्तेखोर व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता असतानाही त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक होत असल्याचाही आरोप त्यांनी केला होता. यामुळे पोलिसांनी तुर्भे विभाग कार्यालयावर निघणाºया मोर्चाला परवानगी नाकारली होती. अखेर आंदोलकांच्या शिष्टमंडळाने तुर्भे विभाग अधिकाºयांना मागणीचे निवेदन देवून नियोजित मोर्चा आवरता घेतला.
फेरीवाल्यांचे आंदोलन फिसकटले, पोलिसांनी नाकारली आंदोलनाची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 02:33 IST