बटरफ्लाय पार्कमध्ये १०० हून अधिक प्रजाती
By Admin | Updated: December 14, 2015 01:34 IST2015-12-14T01:34:02+5:302015-12-14T01:34:02+5:30
आपल्याच सूर, ताल, लयीत मग्न असणाऱ्या, आसमंतात स्वच्छंद विहरणाऱ्या फुलपाखरांकडे पाहिलं की पावले आपोआप थांबतात...

बटरफ्लाय पार्कमध्ये १०० हून अधिक प्रजाती
प्राची सोनवणे, नवी मुंबई
आपल्याच सूर, ताल, लयीत मग्न असणाऱ्या, आसमंतात स्वच्छंद विहरणाऱ्या फुलपाखरांकडे पाहिलं की पावले आपोआप थांबतात... आणि क्षणिक का होईना स्तब्ध व्हायला होते. हे सृष्टीचे वैभव अनुभविण्यासाठी सीबीडी सेक्टर ९ परिसरातील रेडिडेन्ट्स अॅग्रो सोसायटीच्या वतीने बटरफ्लाय पार्कची निर्मिती करण्यात आली असून रविवारी या बटरफ्लाय पार्कमध्ये विविध प्रकारचे फुलपाखरु, कीटक तसेच निसर्ग परीक्षण करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती. या ठिकाणी १००हून अनेक प्रजातीच्या फुलपाखरांची माहिती नागरिकांना देण्यात
आली.
दिवसेंदिवस होत असलेल्या पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे फुलपाखरांच्या अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. गगनचुंबी इमारती, मोठमोठे मॉल व घरांचे कॉम्प्लेक्स अशा सर्व ठिकाणी मुद्दाम तयार केलेली लँडस्केप गार्डन्स दिसतात. अशा बागा हिरव्यागार रंगाचा आविष्कार दाखवत असली तरी त्यात नैसर्गिक रंगीबेरंगी फुलपाखरांसारखे कीटक-पक्षी तिथे आढळत नाही. त्यासाठी बागेसारख्या विशेष उद्यानाची आवश्यकता आजच्या क्षणी निर्माण झाली आहे.
ही गरज ओळखून सीबीडीतील सेक्टर ९ परिसरात रेडिडेन्ट्स अॅग्रो सोसायटी, स्थानिक ज्येष्ठ नागरिक तसेच पर्यावरणप्रेमींच्या पुढाकाराने बटरफ्लाय पार्क निर्माण केले आहे.
दुर्मीळ अशा फुलपाखरांना टिकवून ठेवणे त्यांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने बटरफ्लाय पार्कची निर्मिती करण्यात आली आहे.
फुलपाखरांचे आणि मानवी जीवनाचे खूप वेगळे नाते आहे. फुलपाखरांची आयुर्मर्यादा अत्यंत कमी कालावधीची म्हणजेच ३० दिवसांपासून ते ९० दिवसांपर्यंतचा असते. फेब्रुवारी ते जून दरम्यानचा कालावधी फुलपाखरांच्या बागडण्यासाठी, बहरण्यासाठी कठीण प्रसंग असतो. त्यासाठी या कालावधीत ज्या वृक्ष किंवा झाडींना फुलांचा बहर येतो अशा वृक्षप्रजाती किंवा वनस्पतींची लागवड ठिकाणी केली आहे. फुलपाखरांना आवडणाऱ्या गवतांचे, झुडपांचे, झाडांची लागवड या ठिकाणी करण्यात आली आहे.