तीन गुंडांवर मोक्का
By Admin | Updated: October 22, 2015 00:29 IST2015-10-22T00:29:18+5:302015-10-22T00:29:18+5:30
छोटा राजन टोळीतील गुंडांनी आॅगस्टमध्ये शहरातील नामांकित बिल्डरकडे २६ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तीन आरोपींना अटक केली

तीन गुंडांवर मोक्का
नवी मुंबई : छोटा राजन टोळीतील गुंडांनी आॅगस्टमध्ये शहरातील नामांकित बिल्डरकडे २६ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे.
शहरातील एक बिल्डरला १७ आॅगस्टला छोटा राजनच्या हस्तकांनी खंडणीसाठी धमकी दिली. बिल्डरच्या कार्यालयात जाऊन २६ कोटी रुपयांची मागणी केली होती. चेंबूरमध्ये मीटिंगसाठी आला नाही तर जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याविषयी सदर बिल्डरने नवी मुंबई गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती.
पोलीस आयुक्त प्रभात रंजन, अतिरिक्त आयुक्त विजय चव्हाण व गुन्हे शाखेचे उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणी राजन टोळीतील सुरेश शामराव शिंदे ऊर्फ लक्ष्मण, अशोक हितेंद्र निकम ऊर्फ दाद्या व समित विजय म्हात्रे या तिघांना ७ आॅक्टोबरला अटक केली आहे. त्यांच्याकडून ३६३ ग्रॅम वजनाचे दागिने, ५ मोबाइल, ५३ हजार रोख व कार असा १८ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. आरोपी छोटा राजन टोळीशी संबंधित असून, त्याच्या सांगण्यावरून धमकी दिली असल्यामुळे चार जणांविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. पुढील तपास परिमंडळ दोनचे उपायुक्त विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (प्रतिनिधी)
कारवाईचा धडाका
गुन्हे शाखेचे उपायुक्तत सुरेश मेंगडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून गुन्हेगारांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. यापूर्वी रवी पुजारी टोळीतील गुंडांवर, सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई केली होती. शहरात पहिल्यांदाच एवढ्या कमी काळात मोक्काच्या तीन कारवाया झाल्या आहेत.