सोनसाखळी चोरांच्या टोळीवर मोक्का

By Admin | Updated: September 26, 2015 01:19 IST2015-09-26T01:19:58+5:302015-09-26T01:19:58+5:30

सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्यासह चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. एकूण १३ जणांची टोळी असल्याचे तपासात उघड झाले आहे

Mokka on the gang of thieves | सोनसाखळी चोरांच्या टोळीवर मोक्का

सोनसाखळी चोरांच्या टोळीवर मोक्का

नवी मुंबई : सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्यासह चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. एकूण १३ जणांची टोळी असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यांनी नवी मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये चोरी केल्याचे तपासात समोर आहे. ४४ गुन्हे उघडकीस आले असून १८ लाख २९ हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पहिल्यांदाच सोनसाखळी चोरी करणाऱ्यांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
नवी मुंबईसह देशातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. धूम स्टाईल मोटारसायकल चालवून महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावले जात आहेत. नवी मुुंबई पोलीस आयुक्त प्रभात रंजन, अतिरिक्त आयुक्त विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा व परिमंडळ एकमधील पोलीस या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. डिसेंबर २०१४ मध्ये वाशीतील एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावून नेली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आरोपीचा चेहरा दिसला होता. हा गुन्हा अट्टल सोनसाखळी चोर सादीकअली युसुफ सय्यद ऊर्फ जाफरी याने केला असल्याचे निदर्शनास आले. कल्याणमधील आंबिवलीमध्ये राहणाऱ्या या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले. जूनमध्ये तो चोरी करण्यासाठी तळोजाला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी शिळफाट्याजवळ सापळा रचला होता. परंतु सुगावा लागताच सादीकअलीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पाठलाग करून त्याला व त्याच्या साथीदारास अटक करण्यात आली. त्यांनी १६ गुन्हे केल्याचे उघडकीस आले. त्यांच्याकडून ५ लाख ४३ हजार ४०० रुपयांचे दागिने हस्तगत केले. ४ मोटारसायकल, १ कार हस्तगत केली आहे.
सादीकअलीची चौकशी करत असताना तो सोनसाखळी चोरीची टोळी चालवत असल्याचे समोर आले. तो व इतर १२ साथीदारांनी एकूण ४४ गुन्हे केल्याचे तपासात समोर आहे. या प्रकरणी आतापर्यंत मेहंदी सय्यद, मुसा अन्नू सय्यद, अली अब्बास यांना अटक केली आहे. अटक आरोपींकडून ७०३ ग्रॅम वजनाचे १८ लाख २९ हजार २०० रुपयांचे दागिने हस्तगत केले आहेत. संघटितपणे हे आरोपी सोनसाखळी करत असल्यामुळे त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुनील बाजारे, अजित शिंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली असून पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त अरुण वालतुरे करत आहेत. (प्रतिनिधी)

नवी मुंबई : सोनसाखळी चोरी करणाऱ्या इराणी टोळ्यांनी नवी मुंबईसह देशातील प्रमुख महानगरांमध्ये धुमाकूळ घातला आहे. देशभर दहशत निर्माण केलेल्या या चोरट्यांविरोधात गुन्हे शाखेने जोरदार मोहीम सुरू केली आहे. अनेक अट्टल गुन्हेगारांना अटक केली असून मोक्काचीही कारवाई केल्यामुळे इराणी टोळ्यांचे धाबे दणाणले आहे.
मुंबई, नवी मुंबई, ठाणेसह मध्यप्रदेश, कर्नाटक व इतर राज्यांमध्येही इराणी टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. भिवंडी, अंबिवली, मुंब्रा, शिवाजीनगर पुणे, मध्यप्रदेश, कोल्हापूर, कर्नाटक परिसरामध्ये अनेक इराणी वस्त्या असून तेथील बहुतांश नागरिकांचा चोरी हाच व्यवसाय बनला आहे. सोनसाखळी, बतावणी करून दागिने चोरणे व इतर अनेक प्रकारचे गुन्हे हे आरोपी करत आहेत.
शाखेने अटक केलेल्या सादीकअली या चोरट्याने व त्याच्या साथीदाराने ४४ गुन्हे केल्याचे स्पष्ट झाले आहे. अशाप्रकारच्या अनेक इराणी टोळ्या देशभर कार्यरत आहेत. ठाणे, मुंबई परिसरातील अनेक गुन्हेगार अनेकवेळा विमानाने दिल्ली, मध्यप्रदेश, कर्नाटक व इतर ठिकाणी जावून चोरी करून परत येतात.
धूम स्टाईल मोटारसायकल चालवून सोनसाखळी खेचण्यात त्यांचा हातखंडा आहे. पोलिसांनी नुकत्याच अटक केलेला एक आरोपी अनेक वेळा रोज १० ते १५ तोळे सोने चोरत असल्याचे निदर्शनास आले होते. इराणी टोळ्यांमधील अनेकजण फेरीवाल्याचा व्यवसाय करत असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात बहुतांश जण चोरीच करतात.-
चोरी हाच व्यवसाय झालेल्या इराणी व्यक्तींचे राहणीमान मात्र राजेशाही असते. चांगले कपडे, वाहनांचा शौक त्यांना असतो. घरातील महिलाही रोजचे जेवण शक्यतो हॉटेलमध्येच करतात.
एखाद्या आरोपीस अटक केली तरी त्याच्या घरातील सदस्य कार किंवा रिक्षातूनच प्रवास करतात. गुन्ह्यामध्ये अटक झाली तर सोडविण्यासाठी वकिलांची फौज तयार ठेवलेली असते. श्रीमंती राहणीमानासाठी चोरीचा व्यवसाय करत असून पकडले तरी तुरुंगातून बाहेर आल्यावर पुन्हा अनेकजण चोरीच करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नवी मुंबई गुन्हे शाखेचे उपआयुक्त सुरेश मेंगडे, परिमंडळ एकचे उपआयुक्त शहाजी उमाप यांनी या टोळ्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे.

Web Title: Mokka on the gang of thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.