एमजेपीच्या जलवाहिन्यांना गळती
By Admin | Updated: March 1, 2016 02:51 IST2016-03-01T02:51:19+5:302016-03-01T02:51:19+5:30
पनवेल, उरण जेएनपीटी मार्गावरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाच्या जलवाहिनीला गळती लागलेली असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे

एमजेपीच्या जलवाहिन्यांना गळती
वैभव गायकर, पनवेल
पनवेल, उरण जेएनपीटी मार्गावरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाच्या जलवाहिनीला गळती लागलेली असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय सुरू असून या पाण्याची चोरी देखील होत आहे. चिंचपाडा, करंजाडे, वडघर गावाजवळ ही पाण्याची गळती सुरू असून, लाखो लिटर पाणी यामुळे वाया जात आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळाचे सावट आहे. पनवेलमध्ये देखील दिवसाआड पाणी सोडले जात आहे. नागरिकांमध्ये पाणी बचतीसाठी विविध प्रकारची जनजागृती केली जात आहे. मात्र लाखो लिटर पाण्याची नासाडी होवून सुद्धा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी याठिकाणी फिरकतही नाहीत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने पनवेल नगरपरिषद, जेएनपीटी, सिडको आदींना पाणीपुरवठा केला जातो. सर्वच प्राधिकरणांनी अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे पाणीकपातीला सुरुवात केली आहे. मात्र मागील महिनाभरापासून याठिकाणच्या जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे याठिकाणाहून ये-जा करणारे नागरिक देखील संताप व्यक्त करीत आहेत.
करंजाडे परिसरात सुरू असलेल्या बांधकाम साईट्सवरील मजूर देखील याच ठिकाणी येवून कपडे, भांडी धूत असतात. याठिकाणाहून ये-जा करताना याठिकाणच्या पाण्यात सर्रास मजूरवर्ग आंघोळ करताना नजरेस पडतात. पाच ते सहा ठिकाणी जलवाहिनीला गळती लागलेली दिसून येते. ही जलवाहिनी बंद जरी केली तरी अवघ्या काही तासात पुन्हा या वाहिनीला गळती लागते. जलवाहिनी जीर्ण झाल्यामुळे गळती लागत असते, असे एमजीपीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गळतीमागे काही समाजकंटक जबाबदार असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.