म्हसळा आयटीआयच्या इमारतीची दुरवस्था
By Admin | Updated: August 12, 2016 02:28 IST2016-08-12T02:28:37+5:302016-08-12T02:28:37+5:30
तालुक्यातील विद्यार्थ्यांना अद्ययावत व्यावसायिक शिक्षण मिळावे या हेतूने तालुक्यातील आगरवाडा येथे सुमारे ३ कोटी ५० लाख रुपये खर्च करून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची

म्हसळा आयटीआयच्या इमारतीची दुरवस्था
अमोल जंगम, म्हसळा
तालुक्यातील विद्यार्थ्यांना अद्ययावत व्यावसायिक शिक्षण मिळावे या हेतूने तालुक्यातील आगरवाडा येथे सुमारे ३ कोटी ५० लाख रुपये खर्च करून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची (आयटीआय) दुमजली इमारत बांधण्यात आली. अवघ्या अडीच तीन वर्षांत या इमारतीचे बांधकाम ढासळू लागल्याने हे काम पूर्णपणे नित्कृष्ट दर्जाचे असल्याचे आता निदर्शनास येत आहे. इमारतीचे पत्रे व स्लॅब गळत असल्याने संपूर्ण इमारतीमधील भिंतींवर मोठ्या प्रमाणावर पाणी पाझरत असल्याने शेवाळ आले आहे. आयटीआयमध्ये इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल अशा कोर्सेसमध्ये विद्युत उपकरणे हाताळावी लागत असल्याने पावसाळ्यात शॉक लागत असल्याने विद्यार्थी व शिक्षकांचा जीव धोक्यात आला आहे.
म्हसळा तालुक्यातील आगरवाडा येथे आयटीआयची इमारत बांधण्यासाठी राज्य सरकारने ३ कोटी ५० लाख रुपये मंजूर केले. या इमारतीचे १० फेब्रुवारी २०१३ रोजी तत्कालीन पालकमंत्री आ. सुनील तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे के ले आहे. अनेक ठिकाणी इमारत गळत असल्याने शेवाळ आले आहे. ठिकठिकाणी प्लास्टर, बांधकाम कोसळत आहे. खिडक्या व दरवाजे यांचे बांधकाम कमकुवत असल्याने कधी कोसळतील यांचा भरवसा नाही. स्लॅब, भिंतींना लागलेल्या गळतीमुळे वर्कशॉपमध्ये पाणी साचत असल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन विद्युत उपकरणे हाताळावी लागत आहेत. अनेक ठिकाणी शॉक लागत आहे. गेल्यावर्षी वर्कशॉपच्या शेडचे ट्रान्सपरंट पत्रे व अन्य पत्रे फुटले होते. त्यांची दुरु स्ती करताना नवीन पत्रे नीट न लावता शेडवर ठेवून त्यावरती खडी व माती भरलेल्या पिशव्या ठेवल्या आहेत. या सर्व बाबतीत आयटीआय प्रशासनाने बांधकाम खात्याकडे किमान १२ ते १५ वेळा पत्रव्यवहार केला असून एकदाही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्याची माहिती आयटीआयच्या कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.