उरण परिसरात स्थलांतरित पक्ष्यांची जत्रा, फ्लेमिंगोसह अनेक आकर्षक जलचर पक्षांचा मुक्त संचार !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 08:36 PM2022-11-06T20:36:04+5:302022-11-06T20:36:21+5:30

दरवर्षी थंडीच्या काळात हमखास दृष्टीस पडणारे विविध जलचर आणि फ्लेमिंगो पक्षी उरण परिसरातील विविध पाणथळी जागा, सागरी किनाऱ्यावर दिसु लागले आहेत.

Migratory bird in Uran area, free movement of many attractive water birds including flamingos! | उरण परिसरात स्थलांतरित पक्ष्यांची जत्रा, फ्लेमिंगोसह अनेक आकर्षक जलचर पक्षांचा मुक्त संचार !

उरण परिसरात स्थलांतरित पक्ष्यांची जत्रा, फ्लेमिंगोसह अनेक आकर्षक जलचर पक्षांचा मुक्त संचार !

Next

मधुकर ठाकूर 

उरण: दरवर्षी थंडीच्या काळात हमखास दृष्टीस पडणारे विविध जलचर आणि फ्लेमिंगो पक्षी उरण परिसरातील विविध पाणथळी जागा, सागरी किनाऱ्यावर दिसू लागले आहेत. आकर्षक जलचर पक्षांच्या मुक्त संचारामुळे उरण परिसरात स्थलांतरित पक्ष्यांची जणू काही जत्राच भरली असल्याचे चित्र आहे. 

उरण परिसरात विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर होणार्‍या दगड-मातीच्या प्रचंड भरावामुळे पाणथळी जागा, पक्ष्यांच्या वास्तव्याची ठिकाणे नष्ट झाली आहेत. पक्षांच्या वास्तव्यांच्या, आश्रयांच्या जागा नष्ट झाल्याने परदेशातून हजारो मैलांचे अंतर कापून येणार्‍या स्थलांतरीत विशेषतः फ्लेमिंगो पक्षांची संख्या मागील काही वर्षांपासून कमालीची रोडावली होती. त्यानंतर कोरोना महामारीतील दोन वर्षात परिसरातील औद्योगिक धडधड थंडावली होती.

यामुळे उरण परिसरातील पाणथळी जागा, खाडी किनाऱ्यांवर शांततेचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच स्थलांतरित पक्षांच्या वास्तव्यासाठी वातावरण पोषक बनले आहे. त्याशिवाय स्थलांतरित पक्ष्यांच्या वास्तव्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी पाणथळी जागा, खारफुटी,कांदळवने वाचवण्यासाठी पर्यावरणवादी संघटनांनी संघर्ष करीत सरकारवर दबाव आणला होता.

न्यायालयातही लढा सुरू केला होता. याचा परिणाम होऊन पाणथळी जागा,खारफुटी, कांदळवने वाचवण्यासाठी केंद्र, राज्यातील दोन्ही सरकारने हजाराहून अधिक जागा जतन व संरक्षणासाठी वनविभागाकडे सुपुर्द केल्या आहेत. यामुळे परिसरात हिरवळ वाढण्यास एकप्रकारे मदतच झाली असून यामुळे परिसरात वास्तव्यास येणाऱ्या स्थलांतरित पक्षांत मागील दोन वर्षात वाढ झाली असल्याचे पर्यावरणवादी संघटनांकडून सांगितले जात आहे. 
 मुंबईपासून सुरु होणाऱ्या एलिफंटा, मोरा, जेएनपीए,  रेवस, करंजा या सागरी प्रवासा दरम्यान समुद्रात रशिया, आस्टेलिया व इतर देशातुन स्थलांतरित सीगल पक्षी मोठ्या प्रमाणावर स्वैर विहार करताना दिसु लागले आहेत.

तर उरण परिसरातील पाणजे, डोंगरी, जसखार, सोनारी,जासई,नवीन शेवा,विविध खाडी किनारे आणि पाणथळी जागांवर विविध प्रकारच्या जातींचे आकर्षक जलचर पक्षी आणि स्थलांतरित फ्लेमिंगो पक्षी मोठ्या संख्येने पाहावयास मिळत आहेत. फ्लेमिंगो व इतर विविध जातींच्या जलचर पक्षांचा मुक्त संचार पक्षी प्रेमींसाठी पर्वणी ठरत आहे.त्यामुळे पक्षीप्रेमीही मोठ्या प्रमाणात दिसणार्‍या पक्षांच्या विविध लिला पाहाण्याचा आनंद पर्यटक, प्रवासी, पक्षीप्रेमी घेऊ लागले आहेत.

Web Title: Migratory bird in Uran area, free movement of many attractive water birds including flamingos!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.