मुजोर रिक्षाचालकांकडून प्रवासी वेठीस

By Admin | Updated: November 2, 2015 01:52 IST2015-11-02T01:52:08+5:302015-11-02T01:52:08+5:30

वाशी रेल्वे स्थानक ते कोपरखैरणे मार्गावर प्रवास करणाऱ्यांवर रिक्षाचालकांनी भाडेवाढ लादली आहे. अचानक झालेल्या भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे

Migrant workers from Mujor rickshaw drivers | मुजोर रिक्षाचालकांकडून प्रवासी वेठीस

मुजोर रिक्षाचालकांकडून प्रवासी वेठीस

नवी मुंबई : वाशी रेल्वे स्थानक ते कोपरखैरणे मार्गावर प्रवास करणाऱ्यांवर रिक्षाचालकांनी भाडेवाढ लादली आहे. अचानक झालेल्या भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. वाहतूक पोलिसांनी बेकायदा चौथी सीट बंद केल्याचे निमित्त साधत रिक्षा संघटनेने प्रवाशांना वेठीस धरले आहे.
वाशी रेल्वे स्थानक ते कोपरखैरणे मार्गावर धावणाऱ्या रिक्षांच्या भाडेदरात शुक्रवारपासून वाढ झाली आहे. रिक्षाचालक-मालक एकता युनियनने झालेल्या या दरवाढीचा फलक स्थानकाबाहेरील रिक्षा स्टँडवर लावलेला आहे. परंतु अचानक झालेल्या या भाडेवाढीमुळे प्रवाशांचे रिक्षाचालकांसोबत वाद होऊ लागले आहेत. यापुर्वी वाशी स्थानक ते एमजीएमपर्यंत १०, तर कोपरखैरणेपर्यंत २० रुपये घेतले जायचे. मुळात सन २०१४ च्या आरटीओच्या दरपत्रकानुसार हे दर कमीच होते. मात्र आरटीओने वाशी-कोपरखैरणे मार्गावर शेअर रिक्षासाठी २८ रुपये दराची मान्यता दिलेली असतानाही रिक्षाचालक स्वत:च्या सोयीनुसार २० रुपये भाडे आकारत होते. तर दर कमी केल्याच्या बदल्यात रिक्षात बेकायदा चौथा प्रवासी घेतला जायचा. यामुळे वाशी-कोपरखैरणे मार्गावर सर्रास चौथा प्रवासी घेऊनच रिक्षा चालवल्या जात होत्या. मात्र त्याकडे अनेक दिवस डोळेझाक केल्यानंतर वाहतूक पोलिसांनी चौथा प्रवासी घेणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाईला सुरुवात केली आहे. ही कारवाई टाळत होणारा तोटा भरून काढण्यासाठी रिक्षाचालक संघटनेने प्रवास भाड्यात पाच रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सुधारित दरानुसार वाशी स्थानक ते एमजीएमपर्यंत १५, तर कोपरखैरणे पर्यंत २५ रुपये भाडे आकारायला सुरुवात केली आहे. हे दर आरटीओची मान्यता असलेल्या २८ रुपयांपेक्षा कमीच असल्याने त्यात काही गैर नसल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. मात्र आरटीओने जेव्हा भाडेवाढ करायला मान्यता दिलेली तेव्हाच ती लागू न करता त्यात सोयीनुसार बदलाचे अधिकार रिक्षा संघटनांना दिले कोणी, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित होत आहे. तसेच रिक्षात चौथा प्रवासी घेणे बेकायदेशीर असतानाही आरटीओ व वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकांचे लाड कशासाठी पुरवायचे, असाही यावरून वाशी रेल्वे स्थानकालगतच्या रिक्षा स्टँडवर रिक्षाचालक व प्रवासी यांच्यात वाद होऊ लागले आहेत. त्यामध्ये रिक्षाचालकांची अरेरावीची भाषा सहन करावी लागत आहे.

Web Title: Migrant workers from Mujor rickshaw drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.