आपत्ती व्यवस्थापनाची एमआयडीसीत कमतरता, तळोजातील कंपन्यांसह अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 02:57 AM2019-11-25T02:57:24+5:302019-11-25T02:57:48+5:30

तळोजा एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी अनेकदा आल्या आहेत. तसेच याठिकाणी आपत्ती व्यवस्थापन करता ज्या गोष्टींची गरज आहे, त्याकडे एमआयडीसीचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.

MIDC deficiencies in disaster management, neglect of officials, including companies in the basement | आपत्ती व्यवस्थापनाची एमआयडीसीत कमतरता, तळोजातील कंपन्यांसह अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

आपत्ती व्यवस्थापनाची एमआयडीसीत कमतरता, तळोजातील कंपन्यांसह अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

Next

कळंबोली : तळोजा एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी अनेकदा आल्या आहेत. तसेच याठिकाणी आपत्ती व्यवस्थापन करता ज्या गोष्टींची गरज आहे, त्याकडे एमआयडीसीचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. आपत्ती आल्यानंतर त्वरीत काय करायचे याविषय नियोजन नाही. तसेच शीघ्रकृती टिम नसल्याने अनेक अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळ एमआयडीसीची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.
तळोजा परिसरात ९०७ हेक्टर जागेवर एमआयडीसी वसविण्यात आली. याठिकाणी १२०० भूखंड असून शेकडो छोट्या मोठ्या कारखान्यांची नोंद असून मोठी औद्योगिक उलाढालही मोठी आहे. त्यामध्ये इंजिनीअरिंग, मत्स्य प्रक्रिया, फूड, केमिकल्स आदी कारखानांचा समावेश आहे. या ठिकाणी लाखो कामगार काम कार्यरत आहेत. एमआयडीसी परिसरात आगी लागण्याच्या अनेक घटना घडल्या असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कारखान्यातील घातक वायू गळतीमुळे कामगारासह परिसरातील गावांनाही फटका बसत आहे.
अग्निसुरक्षा असो,वायू गळती असो वा रसायन गळती, अशा घटना हाताळण्यासाठी तळोजा एमआयडीसीकडे आपत्कालीन आराखडा नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आपत्ती किंवा अप्रिय घटना घडल्या नेमके करायचे काय? याचे नियोजनच नाही. एमआयडीसीमध्ये प्रत्येक प्लांटनुसार आराखडा तयार नाही. वायुगळतीसारखा प्रकार घडल्यास, आजूबाजूच्या ग्रामस्थांनी काय करायचे, याविषयी गेल्या अनेक वर्षात प्रशिक्षण एमआयडीसी व औद्योगिक सुरक्षा विभागाकडून देण्यात आले नाही. येथे अग्निशमन दल सोडले तर क्विक रेस्पोंसिबल टीम उपलब्ध नाही. एमआयडीसीकडे तज्ज्ञांचे पथकही नाही. त्याचबरोबर काही कारखान्यांनी नियम धाब्यावर बसल्याचे दिसून येत आहे.
औद्योगिक सुरक्षा नियमावलीचे अनेक कंपन्यांकडून पालन केले जात नाही. सुरक्षा परिक्षण करण्याकरीता स्वतंत्र अशी टीम नाही. फॅक्टरी इन्स्पेक्टरने परिसरातील कंपन्यांची नियमित पहाणी करणे आवश्यक आहे, मात्र तसे होत नसल्याचे येथील कामगारांचे म्हणणे आहे. त्यामुळे परिसरात वारंवार अपघाताच्या
घटना घडत असून लाखो
कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.
खरंतर, एमआयडीसीतील प्रत्येक कारखान्यांमध्ये कोणते आणि किती उत्पादन केले जाते. त्यासाठी वापरण्यात येणारी घातक रसायने, वायू, तेल आदी सामग्री आदींची माहिती अग्निशमन दलाला वेळोवेळी देणे गरजेचे आहे. परंतु कंपन्यांकडून तसेच एमआयडीसीतील संबंधित अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर येत आहे. आग लागल्यावर अनेकदा कंपन्यांमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणाही कार्यान्वित नसल्याचे समोर आले आहे. आग आटोक्याबाहेर गेल्यावर अग्निशमन विभागाला पाचारण करण्याचे प्रकारही अनेकदा घडत असल्याने कामगारांचा जीव कायम टांगणीला असतो. औद्योगिक क्षेत्रातील कित्येक कारखान्यात अग्निशमनचा संपर्क क्रमांकही नसल्याचे समोर आले
आहे.

एमआयडीसी अग्निशमन
दलाकडून जनजागृती
एमआयडीसीच्या अग्निशमन दलाकडून टीएमएच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. त्यांना आग तसेच वायूगळतीच्या घटना घडू नये, म्हणून करावयाच्या उपाययोजना याविषयी माहिती देण्यात आली.
त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्वरित अग्निशमन दलाला कळविण्यात यावे, याकरता टीएमएच्या मार्फत स्टिकर देण्यात आले. त्याचा सकारात्मक परिणाम दिसत असल्याचे अग्निशमन अधिकारी दीपक डोरुगाडे यांनी सांगितले.

तळोजा एमआयडीसीमध्ये घडलेल्या महत्त्वाच्या घटना
२०१६ मध्ये टिकी टायर या कंपनीत लागलेल्या आगीत सात कामगारांचा मृत्यू झाला होता.
२०१७ मध्ये नीडलेक्स या कंपनीत दोन कामगारांचा आगीत जळून मृत्यू झाला.
१६ डिसेंबर २०१८ मध्ये एमएसआर कंपनीत आग लागली.
२८ एप्रिल २०१८ रोजी दीपक फर्टीलायझर या कंपनीत गॅस गळती झाली होती. यामध्ये एका कामगारांचा बळी गेला. याचवर्षी नाईक ओसीयार याकडे या कंपनीत अमोनिया वायुगळती झाली. त्यामध्ये सात जणांना रुग्णालयात उपचार करण्यास घेऊन जावे लागले होते. २३ आॅगस्ट २०१९ ला केमस्पेट या वादग्रस्त कंपनीत आग लागली. याठिकाणी गेट लहान असल्याने अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागेल. त्या अगोदर याच महिन्यात ५ तारखेला भंगार गोदाम आगीत भस्मसात झाले. त्याठिकाणी सात कामगारांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
१४ जून २०१९ ला डब्ल्यू २१६ या भूखंडावरील केमिकल कंपनीला आग लागली. येथील वायू मुळे आग गटारात पोचली. त्यामुळे २० ते २५ कंपन्यांना धोका निर्माण झाला. ठिकठिकाणाहून अग्निशमन बंब बोलावून ही आग आटोक्यात आणली. तसेच रामके कंपनीतही स्पोट होऊन कामगारांचा बळी गेला. त्यामुळे आजूबाजूचा परिसरा बरोबरच कल्याण तालुक्यातील काही गावे हादरले.

आपत्ती व्यवस्थापनाचा सांगायचे झाले तर आमच्याकडे फायर यंत्रणा आहे. त्या अग्निशमन दलात गाड्या व मनुष्यबळ आहे. आपत्ती आराखडासुध्दा तयार आहे. ज्या त्रुटी आहेत त्याची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. ज्यामुळे येथील सुरक्षा अबाधीत राहु शकेल.
- दीपक बोबडे-पाटील, उपअभियंता तळोजा एमआयडीसी

Web Title: MIDC deficiencies in disaster management, neglect of officials, including companies in the basement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.