मेट्रो - विकासाचा महत्त्वाचा टप्पा
By Admin | Updated: October 6, 2015 00:51 IST2015-10-06T00:51:09+5:302015-10-06T00:51:09+5:30
नवी मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, परिवहन सेवेच्या मागणीनुसार मेट्रोची कल्पना सिडकोला सुचली. दिल्लीच्या धर्तीवर, नवी मुंबईतही मेट्रोच्या उभारणीला सुरु वात झाली

मेट्रो - विकासाचा महत्त्वाचा टप्पा
- वैभव गायकर , पनवेल
नवी मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, परिवहन सेवेच्या मागणीनुसार मेट्रोची कल्पना सिडकोला सुचली. दिल्लीच्या धर्तीवर, नवी मुंबईतही मेट्रोच्या उभारणीला सुरु वात झाली असून पाच टप्प्यातील या मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरु वात झाली आहे. लवकरच ते पूर्ण होणार आहे. २0१६ च्या अखेरपर्यंत नवी मुंबईमध्ये मेट्रो रेल्वे धावेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ३0 सप्टेंबर २0१0 मध्ये बेलापूर ते पेंधर या ११ किमीच्या मार्गाच्या कामाला सुरु वात झाली.
भविष्यात येऊ घातलेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या दृष्टीने नवी मुंबई मेट्रो प्रकल्प हा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. शहरात होणारी वाहतूक कोंडी यामुळे साहजिकच कमी होईल. पहिल्या टप्प्यातील बेलापूर ते पेंधर या मार्गाचे काम प्रगतीपथावर असून जवळ ८0 टक्के पूर्णत्वाला आले आहे. या मार्गात एकूण ११ स्थानके आहेत. ११.१0 किमीचा हा मार्ग बेलापूर टर्मिनल येथून तळोजापर्यंत जोडलेला आहे.
मेट्रामुळे रस्त्यावरील वाहतूक कमी होईल, हा एक महत्त्वाचा फायदा होणार आहे. बेलापूर ते पेंधर या पहिल्या टप्प्याच्या कामाला १९८५ कोटी रु पये खर्च अपेक्षित असल्याचे सिडकोच्या वतीने सांगण्यात आले होते. २0१४ मध्ये हे प्रकल्प पूर्णत्वाला येणार होते, मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे २0१६ अखेर या मार्गावर मेट्रो रेल्वे धावण्याची शक्यता आहे. सीबीडी बेलापूर टर्मिनल से. ७ सीबीडी बेलापूर, सायन्स पार्क खारघर, उत्सव चौक खारघर, से. ११ खारघर, से. १४ खारघर, सेन्ट्रल पार्क, पेठपाडा, सेक्टर ३४ खारघर, तळोजा पाचनंद, पेंधर टर्मिनल या ११ स्थानकांचा यामध्ये समावेश आहे. यानंतरचा दुसरा खांदेश्वर ते तळोजापर्यंत जोडला जाणार आहे. एकूण ८.३५ किमीच्या या मार्गात एकूण ८ स्थानके आहेत. १५0९ कोटी रु पये अपेक्षित खर्च या प्रकल्पाला होणार आहे.
खांदेश्वर, सेक्टर १0 कामोठे, से. २ ई कळंबोली, से. १३ कळंबोली, से. ७ ई कळंबोली, कासाडी, एमआयडीसी स्थानक १, एमआयडीसी २ या ८ स्थानकांचा यामध्ये समावेश आहे. मेट्रो प्रकल्पाचा सर्वात जास्त फायदा या ठिकाणच्या नागरिकांना होणार
आहे.
पारंपरिक वाहतूक व्यवस्थांना आता पर्यायी व्यवस्था म्हणून मास रॅपिड ट्रांझिट सिस्टीम विकसित करण्याची गरज आहे. ज्यामुळे या नवोदित शहराच्या प्रगतीच्या मार्गातील प्रवास या मुख्य घटकाची दिवसेंदिवस वाढत जाणारी गरज पूर्ण करता येईल. तथापि, जलद परिवहन व्यवस्थेचा विकास करताना पूर्वनियोजित आखणी आणि व्यवस्थापन करणे अपेक्षित असते. इतर विकसित देशांचे नियोजन पाहता असे लक्षात येते की साधारणपणे शहराची लोकसंख्या १0 लाखांच्या आत असताना हे नियोजन करणे आवश्यक असते. पण सध्या नवी मुंबईची लोकसंख्या २0 ते ३0 लाखांच्या घरात गेल्याने आता अशी परिवहन व्यवस्था नव्याने निर्माण करणे शक्य होऊ शकत नाही, तेव्हा नियोजन तज्ज्ञांनी नवी मुंबईच्या विकासकामात एक पाऊल पुढे जाण्याचे ठरविले आहे. हे पुढचे पाऊल म्हणजेच पारंपरिक रस्ते आणि रेल्वेहून थोडा वेगळा, मेट्रो रेल प्रकल्प आहे, याचा फायदा परिवहन व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नक्कीच होईल.
स्टँडबाय डिझेल जनरेटर सुरू
एखाद्या वेळेस वीज पुरवठा करणारे सर्व स्रोत काम करेनासे झाल्यास ट्रेन आणि स्थानके दोन्हींच्या कार्यशीलतेवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मेट्रोच्या प्रत्येक स्थानकावर २00 केवीए क्षमतेचे डिझेल जनरेटर बसविण्यात आले आहेत, जे गरजेच्या वेळी पुढील सुविधा पुरवतील...
पाच टप्प्यामधील पहिला टप्पा बेलापूर ते खांदेश्वर २३.४0 किमी, मानखुर्द ते पनवेल ३२ किमी, शिवडी ते घाटकोपर २२ किमी, दिघे, तुर्भे बेलापूर २0 किमी, वाशी- घणसोली - महापे ९ किमी अशा एकूण १0४.४0 किमीच्या मेट्रो मार्गाचे जाळे भविष्यात नवी मुंबई व मुंबईमध्ये पसरणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्याचे काम सिडको नियुक्त एजन्सी तर उर्वरित चार टप्प्याचा विकास एमएमआरडीए करेल.
तिसरा टप्पा मार्गिका १ व मार्गिका २ ला जोडून तयार केला जाणार आहे. यासाठी अंदाजित खर्च ५७४ कोटी असून प्रत्यक्ष कामाला सुरु वात झाल्यानंतर हा खर्च वाढणार आहे. अपेक्षित हा मार्ग येत्या ५ वर्षात पूर्ण होणार असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग वाढवून विमानतळाशी जोडला जाणार आहे.
मेट्रोमध्ये स्वयंचलित तिकीट यंत्रणा
पुरेशा प्रमाणात वीज पुरवठा करता यावा यासाठी प्रत्येक मेट्रो मार्गासाठी दोन आर.एस.एस. चा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. दोनपैकी एखादा आर.एस.एस. बंद पडल्यास दुसरा कार्यरत असलेला त्याचाही भार सांभाळेल आणि जर दोन्ही आर.एस.एस. बंद पडले तर दुसऱ्या स्थानकावरचा आर.एस.एस. तेथे हलविता येईल अशी व्यवस्था करण्यात येईल. मार्गिका -१ वर हे आर.एस.एस. उत्सव चौक आणि उत्सव चौक -पहिला उपमार्ग येथे जोडण्यात येतील तर मार्गिका- २ वर एम.आय.डी.सी. स्थानक -१ आणि खांदेश्वर रेल्वे स्थानकानजीक योजण्यात येणार आहे.