मेटल, आॅक्साइडच्या दागिन्यांना पसंती
By Admin | Updated: October 13, 2015 01:38 IST2015-10-13T01:38:46+5:302015-10-13T01:38:46+5:30
नवरात्रोत्सवाचा केंद्रबिंदू म्हणजे दांडिया. नऊ दिवसांच्या दांडियामध्ये नटण्याथटण्यासाठी तरुणींची जिव्हाळाची गोष्ट म्हणजे आकर्षक दागिने.

मेटल, आॅक्साइडच्या दागिन्यांना पसंती
प्राची सोनवणे, नवी मुंबई
नवरात्रोत्सवाचा केंद्रबिंदू म्हणजे दांडिया. नऊ दिवसांच्या दांडियामध्ये नटण्याथटण्यासाठी तरुणींची जिव्हाळाची गोष्ट म्हणजे आकर्षक दागिने. पोशाख कितीही सुंदर असला तरी दागिन्यांशिवाय त्याचे सौंदर्य नजरेत भरत नाही. त्यामुळे अगदी डोक्यापासून ते पायापर्यंत विविध प्रकारचे दागिने बाजारात दाखल झाले आहेत.
गरब्यासाठी वेगवेगळ्या मेटलच्या, आॅक्साइड, तांब्या-पितळाच्या दागिन्यांचे आणि काळ्या धाग्यापासून बनविलेले आकर्षक नेकलेस ६० रुपयांपासून ८०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. हातातले राजस्थानी कडे घागऱ्यावर बांधण्यासाठी कमरपट्टा आदी आभूषणे पारंपरिकतेत आणखी भर टाकतात. डायमंड, मेटल यापासून बनविलेले आकर्षक कमरपट्टे ५० रुायांपासून २,००० रुपयांपर्यंत मिळतात. नवरात्रीचा स्पेशल लूक आणण्यासाठी बाजारात खास आॅक्झिडाइज ज्वेलरी दाखल झाली असून यात बांगड्या, बिंदी, नेकपिस, इअररिंग, कलरफुल गोंडा यांसारखे अनेक दागिने बाजारात उपलब्ध आहेत.
सिल्क थ्रेडचा वापर करून बनवलेल्या बांगड्यांनाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. नऊ रंगांच्या नऊ बांगड्यांचा सेट तसेच एथेनिक नेलपेंट प्रिंटदेखील बाजारात आल्या आहेत. राजस्थान, गुजरातमध्ये केसाच्या भांगामध्ये बिंदी घालण्याची पद्धत आहे. दांडियाच्या दागिन्यांची सुरुवातही या बिंदीपासून होते. भांगामध्ये तीन साखळ्या व कपाळावर रुळणारे लोलक अशा साध्या दागिन्यांपासून भांगाच्या दोन्ही बाजूला असलेले घुंगरू, मोठे लोलक, त्यावर मनोवेधक नक्षी अशा विविध प्रकारांत बिंदी सजल्या आहेत.
दागिन्यांचा करडा रंग हे त्याचे मुख्य वैशिष्ट्य. त्यामध्ये लाल, काळ्या रंगांचे मणी आहेत. काहींची शोभा आरसे वाढवत आहेत; पण खरे सौंदर्य हे करड्या रंगाचेच. गळ्यातल्या दागिन्यांमध्ये लांबसडक हारांपासून गळ्याला चिटकून बसणाऱ्या हारांपर्यंत अनेक प्रकार आहेत. मोठमोठी पदके, त्याला असलेले चौकोनी, त्रिकोणी आकार, घुंगरूंनी केलेली सजावट यामुळे हे दागिने दुरूनही उठून दिसतात. पण दंडात बांगड्या घालण्याची पद्धत हीदेखील घागरा चोलीमधील फॅशनेबल लूक देतात. यासाठी दंडातील बांगड्या पांढऱ्या रंगात मिळतात. कवड्याचे दागिने हे नवरात्रीतील दागिन्यांमधील आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार. कवड्याचा कंबरपट्टा, बाजूबंद, बिंदी हा खास प्रकार दांडियामध्ये शोभून दिसतो.