खारघरमधून ५ लाखाचे मेफेड्रोन जप्त, एकाला अटक
By सूर्यकांत वाघमारे | Updated: November 10, 2023 19:45 IST2023-11-10T19:45:45+5:302023-11-10T19:45:52+5:30
अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

खारघरमधून ५ लाखाचे मेफेड्रोन जप्त, एकाला अटक
नवी मुंबई : गुन्हे शाखा पोलिसांनी खारघरमधून ५ लाख २० हजार रुपये किमतीचे मेफेड्रोन हा अमली पदार्थ हस्तगत केला आहे. याप्रकरणी एकाला अटक केली असून तो ड्रग्स विक्रीसाठी त्याठिकाणी आला होता.
खारघर मधील ओवेगाव परिसरातील स्मशानभूमी लगत एकजण ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक नीरज चौधरी यांनी पथक केले होते. या पथकाने गुरुवारी रात्री ओवेगाव येथील स्मस्थानभूमी परिसरात सापळा रचला होता. यावेळी त्याठिकाणी आलेल्या एका तरुणावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या अंग झडतीमध्ये त्याच्याकडे ५२ ग्रॅम मेफेड्रोन हा अमली पदार्थ आढळून आला.
त्याची किंमत ५ लाख २० हजार रुपये आहे. त्यानुसार शफी अहमद इकबाल अहमद शेख (४६) याच्यावर खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. तो ड्रग्स पुरवठा करणाऱ्या टोळ्यांच्या संपर्कात असल्याने त्याच्याकडून इतरही ड्रग्स विक्रेते पुरवठादार यांची माहिती उघड होण्याची शक्यता आहे. त्यानुसार गुन्हे शाखा पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.