वाशीतील उद्यानामध्ये गर्दुल्ल्यांचे अड्डे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 12:07 AM2019-10-23T00:07:54+5:302019-10-23T00:08:30+5:30

दोन मद्यपी जखमी; स्थानिकांकडून कारवाई करण्याची मागणी

mendicant Parks in Vashi Gardens | वाशीतील उद्यानामध्ये गर्दुल्ल्यांचे अड्डे

वाशीतील उद्यानामध्ये गर्दुल्ल्यांचे अड्डे

Next

नवी मुंबई : वाशीमधील जनरल अरुणकुमार वैद्य उद्यान मद्यपी व गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला आहे. गांजा ओढणारे व सेवन करणाऱ्यांमध्ये काही दिवसांपूर्वी भांडण होऊन दोघे गंभीर जखमी झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही संबंधितांवर कडक कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महान देशभक्ताचे नाव असलेल्या उद्यानामध्ये सुरू असलेले हे प्रकार थांबविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

वाशी सेक्टर १० मधील उद्यानाला महानगरपालिकेने जनरल अरुणकुमार वैद्य यांचे नाव दिले आहे. भारताचे १३ वे भूदलप्रमुख असलेल्या वैद्य यांना १९६५ मधील भारत-पाकिस्तान युद्धातील कामगिरीसाठी महावीर चक्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धामधील कामगिरीसाठी त्यांना दुसऱ्यांना महावीर चक्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या पराक्रमाची आठवण शहरवासीयांना व्हावी, यासाठी उद्यानाला त्यांचे नाव देण्यात आले आहे; परंतु मागील काही महिन्यांपासून या उद्यानामध्ये मद्यपी व गांजासह इतर अमली पदार्थ ओढणाºया तरुणांचा अड्डा तयार झाला आहे.

दिवसरात्र उद्यानामध्ये तरुण नशा करत बसलेले असतात. त्यामुळे उद्यानाजवळून जाण्यासही नागरिकांना भीती वाटू लागली आहे. हे उद्यान नागरिकांसाठी बंदही करण्यात आले होते. स्थानिक नगरसेवक किशोर पाटकर यांनी मद्यपी व अमली पदार्थ ओढणाºयांवर कारवाई करण्याची मागणी वारंवार पोलिसांकडे केली आहे. महापालिकेकडे पाठपुरावा करून येथे सुरक्षारक्षकांचीही नियुक्ती केली आहे. यानंतरही गर्दुल्ल्यांचा अड्डा बंद झालेला नाही. कोणी आक्षेप घेतल्यास त्यांना धमकावले जाते व मारहाणही केली जात आहे.
उद्यानामध्ये अमली पदार्थ ओढणाºया तरुणांमध्ये नुकतीच हाणामारी झाली. यामध्ये दोन तरुण जखमी असून त्यांच्यावर महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशा प्रकारचा राडा या परिसरामध्ये वारंवार होत असतो.

नागरिकांमध्येही दहशतीचे वातावरण आहे. महानगरपालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयाकडे जाताना उद्यानाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या पानटपरीजवळ अमली पदार्थ ओढणारे एकत्र येत असतात. येथेच त्यांना अमली पदार्थ पुरविणारेही येत असतात. त्यांच्यामध्ये किरकोळ कारणांवरून मारामारीही होत असते. या प्रकारांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वेळेत येथील अड्डा पूर्णपणे बंद झाला नाही तर भविष्यात एखाद्याचा खून होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. याविषयी पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. याविषयी लवकरच पोलीस आयुक्त संजय कुमार यांना पुन्हा निवेदन देण्यात येणार आहे.

उपोषणाला बसण्याचा रहिवाशांचा इशारा

वाशी सेक्टर १० मधील उद्यानाजवळील अमली पदार्थांचे सेवन करणाºयांचा अड्डा कायमस्वरूपी बंद व्हावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्यामुळे रहिवाशांमधील असंतोष वाढू लागला आहे. वेळेत ठोस उपाययोजना झाल्या नाहीत तर उपोषण करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

Web Title: mendicant Parks in Vashi Gardens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.