चार सदस्यांचे सदस्यत्व रद्द
By Admin | Updated: July 28, 2016 02:41 IST2016-07-28T02:41:16+5:302016-07-28T02:41:16+5:30
निवडणुकीचा खर्च सादर न केल्याबद्दल पनवेल तालुक्यातील १०० ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. त्यातील चार सदस्यांचे

चार सदस्यांचे सदस्यत्व रद्द
पनवेल : निवडणुकीचा खर्च सादर न केल्याबद्दल पनवेल तालुक्यातील १०० ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. त्यातील चार सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर नेमून दिलेल्या मुदतीत खर्चाचा तपशील न देणाऱ्या सदस्यांना मोठा धक्का बसला आहे.
आॅगस्ट २०१५ मध्ये पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक/पोटनिवडणूक घेण्यात आल्या होत्या. मात्र ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर खर्चाचा तपशील सादर न करणाऱ्या पनवेल तालुक्यातील १०० ग्रामपंचायत सदस्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. उमेदवारांनी नियमानुसार मतमोजणीच्या नंतर ३० दिवसांच्या आत निवडणूकखर्च सादर करणे बंधनकारक असते. तसे न केल्यास ग्रामपंचायत अधिनियमचे १९५८ चे कलम १४ ब नुसार निवडून आल्यास सदस्यत्व रद्द अथवा पाच वर्षांकरिता निवडणूक लढविण्यास अपात्र करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार विहित कालावधी खर्च सादर न केलेल्या पनवेलमधील ४ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. उलवे ग्रामपंचायतीमधील सुगंधा प्रकाश कोळी व रामनाथ महादेव कोळी, पिसार्वे ग्रामपंचायतीमधील संजना गोरक्षनाथ म्हात्रे, खैरवाडी ग्रामपंचायतीमधील कमळी कृष्णा सफरा यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यानुसार यांना अपील करण्याची संधी असल्याचे तहसील विभागाकडून सांगण्यात आले आहे.
खर्च सादर न केलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. यासाठी एक महिन्याचा अवधी देण्यात आला होता. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी उमेदवारांना बाजू मांडण्याची संधी दिली. मात्र, त्यांचे खुलासे समाधानकारक नसल्याने सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. (वार्ताहर)