अनधिकृत शौचालयाला अर्थपूर्ण पाठिंबा

By Admin | Updated: March 3, 2016 02:50 IST2016-03-03T02:50:33+5:302016-03-03T02:50:33+5:30

बेकायदा बांधकामांच्या विरोधात सिडकोकडून कारवाई केली जात आहे. परंतु ही कारवाई केवळ दिखावा असल्याचे दिसून आले आहे

Meaningful support to the unauthorized toilets | अनधिकृत शौचालयाला अर्थपूर्ण पाठिंबा

अनधिकृत शौचालयाला अर्थपूर्ण पाठिंबा

नवी मुंबई : बेकायदा बांधकामांच्या विरोधात सिडकोकडून कारवाई केली जात आहे. परंतु ही कारवाई केवळ दिखावा असल्याचे दिसून आले आहे. यात मोठ्या प्रमाणात अर्थकारण होत असून सिडकोच्या संबंधित विभागाकडून मर्जीतल्या बांधकामांना अभय दिले जात असल्याचा गंभीर आरोप आता रहिवाशांकडून केला जात आहे. खांदा कॉलनीत स्थानिक रहिवाशांचा तीव्र विरोध असलेल्या अनधिकृत शौचालयाला सिडकोच्या या अधिकाऱ्यांनी अशाच प्रकारे पाठीशी घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
खांदा कॉलनीतील सेक्टर ९ परिसरात रायगड मिनी नावाचे एक मार्केट आहे. या मार्केटमध्ये फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. या फेरीवाल्यांना अभय देण्याचे काम शेकापच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्याकडून केले जात आहे. या पदाधिकाऱ्याने येथील फेरीवाल्यांच्या सोयीसाठी मार्केटच्या जवळच असलेल्या एका खासगी गृहनिर्माण सोसायटीच्या संरक्षक भिंतीला लागून अनधिकृत शौचालय उभारले आहे. या शौचालयाच्या दुर्गंधीचा त्रास या सोसायटीतील रहिवाशांना होत आहे. यासंदर्भात येथील रहिवाशांनी अनेकदा सिडकोकडे तक्रारी केल्या आहेत. रहिवाशांच्या वतीने यासंदर्भात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांना सह्यांचे निवेदन देण्यात आले होते.
भाटिया यांनी त्याची तत्काळ दखल घेत या शौचालयावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले होते. परंतु या विभागाने या आदेशालाही केराची टोपली दाखविल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यात सिडकोने मोहीम राबवून या शौचालयावर कारवाईचा दिखावा केला. संपूर्ण शौचालय जमीनदोस्त न करता केवळ त्यावरील पत्रे काढण्यात आले. याचा परिणाम म्हणून अवघ्या काही दिवसांत संबंधित पदाधिकाऱ्याने शौचालयावरील काढलेले पत्रे पुन्हा टाकून त्याचा वापर सुरू केला आहे. याचा या परिसरातील रहिवाशांना त्रास होत असून या प्रकारामुळे रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
सिडकोने यासंदर्भात ठोस कारवाई केली नाही तर थेट न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Meaningful support to the unauthorized toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.