महापौरांना लाल दिव्याचा मोह
By Admin | Updated: September 29, 2015 00:50 IST2015-09-29T00:50:00+5:302015-09-29T00:50:00+5:30
महापौरांच्या गाडीवर लाल दिवा बसविणे नियमात बसत नाही. यानंतरही गणेश विसर्जन मिरवणुकीच्यावेळी नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे

महापौरांना लाल दिव्याचा मोह
नवी मुंबई : महापौरांच्या गाडीवर लाल दिवा बसविणे नियमात बसत नाही. यानंतरही गणेश विसर्जन मिरवणुकीच्यावेळी नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे यांच्या गाडीवर दिवा बसविण्यात आला होता. याविषयी दक्ष नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री, मंत्री व इतर अतिमहत्त्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या वाहनावर लाल दिवा बसविण्यात येतो. परंतु मागील काही वर्षामध्ये महापौरांसह अनेक पदाधिकारी लाल दिव्याचा वापर करू लागले होते. यानंतर शासनाने परिपत्रक काढून महापौरांना त्यांच्या गाडीवर लाल दिवा वापरता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. दोन वर्षांपूर्वी नवी मुंबईचे महापौर सागर नाईक हे लाल दिवा वापरत असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर त्यांनी दिव्याचा वापर केला नव्हता. विद्यमान महापौर सुधाकर सोनावणे यांनीही सुरवातीच्या काळात दिव्याचा वापर केला नव्हता. परंतु गणेश विसर्जनाच्या दिवशी मात्र त्यांनी गाडीवर लाल दिवा लावल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
विद्यमान महापौर सुधाकर सोनावणे साध्या राहणीमानासाठी ओळखले जातात. पद, प्रतिष्ठेचा फारसा विचार न करता ते नागरिकांमध्ये मिसळत असतात. पालिकेच्या सभागृहात सर्वपक्षीयांना सविस्तर चर्चा करण्यासाठी वेळ देत असल्यामुळे शहरात त्यांच्याविषयी सकारात्मक संदेश जावू लागला आहे. परंतु रविवारी विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी त्यांनाही लाल दिव्याचा मोह आवरला नाही. त्यांच्या गाडीवरील दिवा पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. अनेक दक्ष नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
छायाचित्रकारांनी गाडीचे फोटो काढण्यास सुरुवात केल्यानंतर वाहनचालकांनी आमच्याकडे अध्यादेश असल्याचे सांगितले. परंतु तो दाखविण्यास सांगितल्यानंतर मात्र ते काहीही बोलले नाहीत.
(प्रतिनिधी)