मविआला अस्तित्वासाठी करावा लागू शकतो संघर्ष; २०१५ ते सध्याची नवी मुंबईतील पक्षांची स्थिती
By नामदेव मोरे | Updated: December 16, 2025 12:03 IST2025-12-16T12:02:45+5:302025-12-16T12:03:14+5:30
नवी मुंबईमध्ये २०१५ ते २०२५ या काळात मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झाली आहे.

मविआला अस्तित्वासाठी करावा लागू शकतो संघर्ष; २०१५ ते सध्याची नवी मुंबईतील पक्षांची स्थिती
नामदेव मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये २०१५ ते २०२५ या काळात मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झाली आहे. दहा वर्षापूर्वी महापालिकेत सर्वांत मोठा पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वांत लहान पक्ष झाला आहे. सर्वांत कमी नगरसेवक असलेला भारतीय जनता पक्ष सर्वांत मोठा पक्ष बनला आहे. शिवसेनेची शकले झाल्यानंतर शिंदेसेनेने राज्यातील सत्तेमधील भागीदार असलेल्या भाजपकडून सत्ता मिळविण्यासाठी पक्षविस्तार सुरू केला आहे. शहरात महायुतीतच सत्तेसाठी स्पर्धा असून, महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शरद पवार गट, उद्धवसेना यांच्यासह मनसेला अस्तित्व सिद्ध करण्यासाठी संघर्ष करावा लागेल, अशी स्थिती आहे.
नवी मुंबईमध्ये युती झाली तर उमेदवारी न मिळणारे महाविकास आघाडीकडे वळू शकतात. युती नाही झाली तरी शिंदेसेना व भाजप यांच्यामध्येच निवडणुकीचा रणसंग्राम पाहावयास मिळणार आहे. यापूर्वी २०१५ मध्ये नवी मुंबई महापालिकेची निवडणूक झाली होती. २०२० मध्ये कोरोनामुळे जाहीर झालेली निवडणूक रद्द करावी लागली. पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. महापालिकेत वॉर्डाची संख्या २८ असून, १११ नगरसेवक निवडून येतील.
२०१५ चे पक्षीय बलाबल १११ नगरसेवक
राष्ट्रवादी - ५२
शिवसेना - ३८
काँग्रेस - १०
भाजप - ६
अपक्ष - ५
सध्याचे पक्षीय बलाबल
भाजप - ५७
शिंदेसेना - ४५
उद्धवसेना - ५
शरद पवार गट - २
अजित पवार गट - १
काँग्रेस - १