माथेरानचा शिलकी अर्थसंकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2016 02:41 IST2016-03-03T02:41:38+5:302016-03-03T02:41:38+5:30
माथेरान हे केवळ राज्यातील नव्हे, तर देशातील प्रमुख पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे माथेरानच्या पर्यटनपूरक विकासासाठी सादर केलेल्या अर्थसंकल्पाला माथेरान नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत

माथेरानचा शिलकी अर्थसंकल्प
कर्जत : माथेरान हे केवळ राज्यातील नव्हे, तर देशातील प्रमुख पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे माथेरानच्या पर्यटनपूरक विकासासाठी सादर केलेल्या अर्थसंकल्पाला माथेरान नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. हा अर्थ संकल्प शिलकी आहे. माथेरानचे नगराध्यक्ष गौतम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली. माथेरान नगर परिषदेने सादर केलेल्या ४१ कोटी रु पयांच्या अर्थसंकल्पात ४ कोटी २५ लाख रु पये प्रवासी कर हॉटेल टॅक्स तसेच घरपट्टीमधून जमा होणार आहेत. तर साहाय्यक अनुदान, प्रादेशिक पर्यटन अनुदान, जिल्हा नियोजनातून मिळणारे अनुदान, वैशिष्ट्यपूर्ण उपक्र मासाठी मिळणारे अनुदान अशा विविध अनुदानांतून उर्वरित रक्कम जमा होणार आहे. या मधून नागरी सुविधांबरोबर पर्यटन आणि पर्यावरणपूरक कामे करण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी भरीव तरतूद या अर्थसंकल्पात ठेवली आहे.
माथेरानमधील मुख्य रस्ता एमएमआरडीए करणार असले तरी प्रेक्षणीय स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची आगामी पावसात पारंपरिक पद्धतीने दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. गेल्या काही दिवसांत घोड्यावरून पडून पर्यटक जखमी होण्याचे आणि मृत्युमुखी पडण्याचे दुर्दैवी प्रकार घडल्याने यासाठी माथेरान नगर परिषदेच्या वतीने हेल्मेट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे ५ लाख रु पयांची तरतूद करण्यात आली आहे. या शिवाय पर्यटक आणि स्थानिक नागरिकांसाठी ओपन जीमची उभारणी करण्यात येणार असून, त्यासाठी भरीव तरतूद केली आहे. व्यायामशाळेसाठी अद्ययावत उपकरणे देण्यासाठी १० लाख रु पयांची तरतूद आहे.
पर्यटक व नागरिक यांच्या सुरक्षिततेसाठी माथेरानमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माथेरान नगर परिषदेन डिझेल शवदाहिनी उभारली असून, त्यामधील अंत्यसंस्कार मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आदी उपक्र मांसाठी माथेरान नगर परिषदेच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. शिवजयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि संत रोहिदास जयंती साजरी करण्यासाठी नगर परिषद यापुढे अर्थ साहाय्य करणार आहे. यावेळी उप नगराध्यक्षा सुनीता पेमारे, प्रभारी मुख्याधिकारी रवींद्र बावीस्कर माजी नगरध्यक्ष अजय सावंत आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
पर्यटकांना मूलभूत सोयीसुविधांची हमी
अल्पसंख्याक समाजासाठी विकासकामे करता यावी, यासाठी २० लाखांची तरतूद अर्थसंकल्पात आहे. माथेरान नगर परिषदेने गेल्यावर्षी काही विकासकामे हाती घेतली आहेत, त्याची पूर्तता करण्याबाबत या सभेत सविस्तर चर्चा झाली. त्यासाठीदेखील निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पेमस्टर गार्डन आणि एन लॉर्ड गार्डन या दोन उद्यानांत दररोज सायंकाळी संगीत ऐकण्याची सुविधा निर्माण करण्याची तरतूद करण्यात आली आहे.