माथेरानच्या रोपवेचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे

By Admin | Updated: June 1, 2017 05:31 IST2017-06-01T05:24:56+5:302017-06-01T05:31:25+5:30

माथेरानच्या प्रस्तावित रोपवेचे अनेक वर्षे रखडलेले घोंगडे आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. माथेरान येथे त्याबद्दल

Maternal Ropeway Questions Signs Of Getting Route | माथेरानच्या रोपवेचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे

माथेरानच्या रोपवेचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे

लोकमत न्यूज नेटवर्क
माथेरान : माथेरानच्या प्रस्तावित रोपवेचे अनेक वर्षे रखडलेले घोंगडे आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. माथेरान येथे त्याबद्दल पर्यावरणविषयक जनसुनावणी बुधवारी घेण्यात आली. माथेरानकरांनी प्रचंड गर्दी केलेल्या या जनसुनावणीमध्ये अनेकांनी सूचना केल्या आहेत, त्याची नोंद राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आली.
माथेरान रोपवे प्रायव्हेट लिमिटेडने प्रस्तावित केलेल्या प्रकल्पाची पर्यावरणविषयक जनसुनावणी ३१ मे रोजी माथेरानमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राज्य सरकारच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, राज्य प्रदूषण नियंत्रक मंडळाचे विभागीय नियंत्रक ए. एन. हर्षवर्धन यांच्यासमोर घेण्यात आली. सुरु वातीला माथेरान रोपवे कंपनीच्या वतीने सर्व प्रकल्पाचे प्रेझेंटेशन करण्यात आले. त्यांचे संचालक दिलीप गुप्ता, मेहेरनोज डांगोर, टाटा कन्सल्टन्सीचे कर्नल रवी घोडके आदी उपस्थित होते. माथेरान रोपवेचे कर्जत-कल्याण मार्गावरील भूतीवली गावाजवळ मुख्य स्टेशन असणार असून पुढे गारबेट येथे दुसरे स्टेशन आणि नंतर गारबेट ते माथेरान शहरातील माधवजी गार्डन असे अंतिम स्टेशन असणार आहे. २७०० मीटर लांबीचा हा देशातील सर्वात लांब असा रोपवे प्रकल्प आहे. प्रेझेंटेशन झाल्यानंतर माथेरानकरांनी आपली रोपवेबाबतची मते मांडली,त्या सर्व हरकती आणि सूचनांची नोंद सुनावणी घेणारे निवासी उपजिल्हाधिकारी पाणबुडे यांनी घेतली.
नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी विद्यार्थी यांना शैक्षणिक कामासाठी सवलत देण्याची मागणी केली. माजी नगराध्यक्ष अजय सावंत यांनी रोपवेचे स्वागत आणि संबंधित कंपनी यांनी आपला सीएसआर निधी माथेरानमध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून करण्याची मागणी केली. धनगर समाजाचे अध्यक्ष संतोष आखाडे यांनी गारबेटवाडीचा रस्ता तयार करण्याची मागणी केली. वसंत कदम यांनी माथेरानकरांना प्रवासात सूट देण्याची मागणी केली. दीपक शहा यांनी माथेरानकरांना लगेज आणण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष सागर पाटील यांनी विद्यार्थ्यांचा प्रश्न मांडला.शिवसेना संपर्कप्रमुख प्रसाद सावंत यांनी रोपवेमुळे माथेरानमध्ये रोजगार मिळाला पाहिजे,भूतीवली परिसरात मोठी हॉटेल निर्माण झाली तर माथेरानचा पर्यटन व्यवसाय धोक्यात येईल अशी भीती व्यक्त केली.
यावेळी गिरीश पवार,सूर्यकांत कारंडे, जनार्दन पारटे, नितीन सावंत, कुलदीप जाधव यांनी आपली हरकत नोंद केली. माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी रोपवे कंपनीने खाली भूतीवली येथे अ‍ॅम्युझमेंट पार्क न उभारता माथेरानमध्ये उभारावा अशी मागणी केली. नितीन सावंत यांनी माधवजी गार्डन येथील शिवाजी महाराज यांचा पुतळा हे आमचे श्रद्धास्थान असून हेरिटेज असलेल्या या गार्डनची दुरवस्था होणार नाही याची काळजी घेण्याची मागणी केली.

व्हॅली क्र ॉसिंगचे परवाने माथेरान रोपवे कंपनी वन विभाग आणि अन्य परवानग्यांंची माहिती झाली असून संबंधितांनी घेऊन द्यावेत, अशी मागणी प्रसाद सावंत यांनी केली.
नेरळ-माथेरान टॅक्सी संघटनेचा विरोध. नेरळ-माथेरान टॅक्सी संघटना गेली ३० वर्षे प्रवासी वाहतूक करीत आहे. नेरळ-माथेरान घाट रस्ता हा आमच्या ३०० कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन असल्याने आमचा विरोध असल्याचे टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष संतोष शेळके यांनी पत्र देऊन जाहीर केले.

टाटा कंपनी माथेरान रोपवे जॉइंट व्हेंचरमध्ये करणार
माथेरान रोपवेसाठी २००३ पासून माथेरान रोपवे कंपनी प्रयत्न करीत असून ही कंपनी देशातील आघाडीच्या टाटा कन्सल्टन्सीच्या माध्यमातून जॉइंट व्हेंचरच्या माध्यमातून करीत असल्याची माहिती कर्नल रवी घोडके यांनी दिली.

हैद्राबाद येथील पर्यावरणप्रेमी व्ही. सुंदर रेड्डी यांचा विरोध
माथेरान रोपवेसंबंधी हरकत नोंदविण्यासाठी हैद्राबाद येथून पर्यावरण संघटनेचा कार्यकर्ता व्ही. रेड्डी यांनी सुनावणीला उपस्थित राहून हरकत घेण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी सुनावणी घेणारे प्रदूषण मंडळाचे जिल्हा नियंत्रक हर्षवर्धन यांनी तुम्हाला माथेरान माहीत आहे काय?असा प्रश्न करून त्यांना खाली बसविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी त्यांना आपले म्हणणे मांडू देण्याची सूचना केली. त्यावेळी माथेरानकरांनी बाहेरच्या लोकांना बोलू देऊ नका,असा आरडाओरड केला.

Web Title: Maternal Ropeway Questions Signs Of Getting Route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.