मसाला व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2016 01:45 IST2016-06-15T01:45:50+5:302016-06-15T01:45:50+5:30
महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून २४ वर्षांत प्रथमच मुंबई बाजार समितीमधील अतिक्रमणावर कारवाई सुरू झाली. प्रकल्पग्रस्त, गरीब, झोपडीधारक व छोट्या व्यापाऱ्यांवर कारवाई

मसाला व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले
- नामदेव मोरे, नवी मुंबई
महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून २४ वर्षांत प्रथमच मुंबई बाजार समितीमधील अतिक्रमणावर कारवाई सुरू झाली. प्रकल्पग्रस्त, गरीब, झोपडीधारक व छोट्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पालिकेने प्रथमच श्रीमंत व्यापाऱ्यांनी केलेले अतिक्रमण हटविले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांसह बाजार समिती अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून आयुक्त तुकाराम मुंढे शहरवासीयांच्या गळ्यातील ताईत बनू लागले आहेत.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी महानगरपालिकेची परवानगी न घेता पोटमाळे व वाढीव एक मजल्याचे बांधकाम केले आहे. मसाला मार्केटमध्ये ६६० गाळे असून बहुतेक सर्वांनी अनधिकृ त बांधकाम केले आहे. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने २००९ ते २०११ च्या दरम्यान अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांना एमआरटीपीअंतर्गत नोटिसा दिल्या होत्या. नोटीस देवून पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतरही अतिक्रमणावर कारवाई झाली नव्हती. या मार्केटमध्ये सेस विभागाने अनेकवेळा दप्तर तपासणी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केल्याने एकदाही दप्तर तपासणी पूर्ण करता आली नाही. व्यापाऱ्यांच्या दबावामुळे मार्केटमध्ये कधीच ठोस कारवाई केली जात नव्हती.
शहरामध्ये प्रकल्पग्रस्त नागरिकांनी गरजेपोटी बांधलेली घरे, गरिबांच्या झोपड्या, मार्जिनल स्पेस व फेरीवाल्यांवर नियमित कारवाई केली जाते. परंतु महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून एकदाही श्रीमंत व्यापारी व उद्योजकांनी केलेल्या अतिक्रमणावर कारवाई झाली नव्हती. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून अतिक्रमण विरोधी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. आयुक्तांनी कोणत्याही स्थितीमध्ये अतिक्रमण हटविण्याचा निर्धार व्यक्त केल्यामुळे मंगळवारी कारवाई करण्यात आली.
पालिकेच्या कारवाईमुळे बाजार समितीमधील अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. देखभाल शाखेचे अभियंते व प्रशासनामधील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. याप्रकरणी गुन्हे दाखल करून चौकशी केल्यास सर्व सत्य बाहेर येईल, अशा प्रतिक्रिया मार्केटमधील इतर घटक व्यक्त करत आहेत. यामुळे अतिक्रमणांना पाठीशी घालणाऱ्या अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही धाबे दणाणले आहे. व्यापाऱ्यांनीही अतिक्रमण वाचविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.
खैरनार यांच्या कारवाईची आठवण
बाजार समितीमध्ये आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू झाली. एपीएमसीमधील अनेक कामगार, वाहतूकदार व कर्मचाऱ्यांना गो. रा. खैरनार यांची आठवण झाली. खैरनार यांनी गरिबांच्या झोपड्यांपेक्षा श्रीमंतांच्या अतिक्रमणावर कारवाई केली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या अतिक्रमणावरही कारवाई केली होती. नवी मुंबईमध्ये मुंढे यांनीही धनाढ्य व्यापाऱ्यांचे अतिक्रमण तोडण्याचे धाडस दाखविल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी आदर निर्माण झाला आहे.
गुन्हे दाखल करण्याची मागणी
बाजार समितीमध्ये देखभाल शाखा व प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने अनधिकृत बांधकाम झाले आहे. सिडको व पालिकेने यापूर्वी प्रकल्पग्रस्त नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्याच धर्तीवर एपीएमसीमध्ये अतिक्रमण करणारे व त्यांना अभय देणाऱ्यांवर कारवाई करण्याचे व त्यांच्यावर एमआरटीपीअंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जात आहे.