बाजार समितीचा शेतकऱ्यांना न्याय
By Admin | Updated: October 13, 2015 02:11 IST2015-10-13T02:11:19+5:302015-10-13T02:11:19+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गतवर्षी व्यापाऱ्याने आत्महत्या केल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपये बुडाले होते.

बाजार समितीचा शेतकऱ्यांना न्याय
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गतवर्षी व्यापाऱ्याने आत्महत्या केल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपये बुडाले होते. बाजार समिती प्रशासन व संचालकांनी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना ४ लाख ६८ हजार रुपये मिळवून दिले आहेत. जामीनदारांकडून पैसे वसूल केल्याची ही राज्यातील पहिली घटना आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापार करणाऱ्या राधेशाम मोरया या व्यापाऱ्याने गतवर्षी आत्महत्या केली होती. यामुळे त्यांच्याकडे कृषी माल पाठविणाऱ्या शेतकऱ्यांचे लाखो रुपये बुडण्याची भीती व्यक्त झाली होती. शेतकऱ्यांचे पैसे कसे वसूल करायचे, असा प्रश्न उपस्थित झाला होता. बाजार समितीमध्ये विश्वासाने शेतकरी त्यांचा माल पाठवित असतात. शेतकऱ्यांच्या पैशाची जबाबदारी व्यापाऱ्यांप्रमाणे बाजार समितीही घेत असते. मोरया यांनी आत्महत्या केल्यामुळे तत्कालीन संचालक अशोक वाळुंज व बाजार समिती प्रशासनाने सदर व्यापाऱ्याला अडत्याचे लायसन्स देताना जामीनदार असलेल्यांकडून पाच लाख रुपये वसूल केले आहेत. यामधील बाजार फी कपात करून शेतकऱ्यांना ४ लाख ६८ हजार रुपये परत देण्यात आले आहेत. बाजार समितीमध्ये प्रथमच जामीनदाराकडून पैसे वसूल करून ते शेतकऱ्यांना देण्यात आल्याची घटना घडली आहे. आंबेगाव तालुक्यातील १२ शेतकऱ्यांना त्यांचे पैसे परत मिळाले आहेत. शेतकऱ्यांनी याविषयी बाजार समितीचे आभार मानले आहेत. सदर पैसे परत देताना बाजार समितीचे सचिव शिवाजीराव पहिनकर, माजी संचालक अशोक वाळुंज व इतर अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)