बाजार समितीच्या फळ मार्केटला संचारबंदीचा विसर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 12:35 AM2021-04-21T00:35:15+5:302021-04-21T00:35:39+5:30

मध्यरात्रीपर्यंत कँटीन सुरू : मार्केटला धर्मशाळेचे स्वरूप; मुक्त संचारामुळे कोरोना वाढतोय

Market Committee forgets curfew on fruit market | बाजार समितीच्या फळ मार्केटला संचारबंदीचा विसर 

बाजार समितीच्या फळ मार्केटला संचारबंदीचा विसर 

Next



नामदेव मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये संचारबंदीमधील एकाही नियमाचे काटेकोरपणे पालन केले जात नाही. रात्री दहा वाजल्यानंतरही येथील कँटीन सुरू असतात. काही स्टॉल्सही अनधिकृतपणे सुरू ठेवले जात आहेत. मार्केटला धर्मशाळेचे स्वरूप प्राप्त झाले असून मुक्कामी असणारे रोजंदारीवरील कामगार एका जागेवर गर्दी करून गप्पा मारत बसलेले असतात. नियम धाब्यावर बसल्यामुळे मार्केटमध्ये व शहरातही कोरोनाचा प्रसार वाढत आहे.


नवी मुंबईमधील सर्व हॉटेल व कँटीन रात्री आठनंतर बंद असतात. परंतु बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये मध्यरात्रीपर्यंत कँटीन सुरू ठेवली जात आहेत. शहरातील सर्व हॉटेलमधून फक्त पार्सलला परवानगी देण्यात आली आहे. परंतु फळ मार्केटमधील कँटीनमध्ये रात्री १० नंतरही अनेक कामगार जेवण करत बसलेले असतात. शहरात पाचपेक्षा जास्त नागरिक एकत्र दिसल्यास त्यांच्यावर जमावबंदी कायद्याअन्वये गुन्हा दाखल केला जातो. परंतु फळ मार्केटमध्ये रात्री दहानंतरही अनेक ठिकाणी १० ते २० रोजंदारीवरील कामगार एकत्रपणे गप्पा मारत बसलेले असतात. जावक गेटजवळील मोबाइलचे दुकानही मध्यरात्रीपर्यंत सुरूच असते. दिवसा व्यापार सुरू असल्यामुळे मार्केटमध्ये गर्दी असते. जीवनावश्यक वस्तूंमुळे फळ मार्केट सुरू ठेवण्यास परवानगी आहे. पण रात्री व्यापार बंद असतानाही मार्केटमध्ये २ हजारपेक्षा जास्त कामगार वास्तव्य करत आहेत. या कामगारांसाठी कोणतीही नियमावली लागू नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अनागोंदी कारभारामुळे फळ मार्केटमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक व्यापारी, बाजार समितीचे अधिकारी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मार्केटमुळे शहरातही प्रादुर्भाव वाढत आहे.      

      महानगरपालिका प्रशासन शहरात सर्वत्र नियम मोडणारांवर कारवाई करत आहे. परंतु फळ मार्केटमध्ये सर्व नियम धाब्यावर बसविले जात असतानाही संबंधितांवर कडक कारवाई केली जात नाही. शहरात हॉटेल, मॉल व इतर दुकानदारांकडून ५० हजार रुपयांचा दंड घेतला जात आहे. परंतु फळ मार्केटमध्ये चोवीस तास गर्दी असूनही त्यांच्यावर कडक कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. व्यापार कोणत्या वेळेत करायचा, किती वाहनांची आवक झाली पाहिजे याविषयी नियमावली करण्याची व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. 


भाजी मार्केटमध्येही 
अनागोंदीचे वातावरण
भाजीपाला मार्केट अत्यावश्यक सेवेत येत आहे. यामुळे हे मार्केटही चोवीस तास उघडे ठेवण्यात येत आहे. परंतु या सवलतीचा अनेक जण गैरफायदाही घेत आहेत. मार्केटमध्ये सोमवारी रात्री पाहणी केली असता काही ठिकाणी गांजा व मद्यप्राशन करत काही टोळकी बसली असल्याचेही निदर्शनास आले. अशा प्रकारे चुकीचे काम करणारांवर कोणीही अंकुश ठेवताना दिसत नाही. याशिवाय डी विंगमधील किरकोळ विक्रीवर व परवाना नसतानाही व्यापार करणारांवरही कारवाई केली जात नसल्याचेही निदर्शनास आले आहे.

Web Title: Market Committee forgets curfew on fruit market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.