नोकरीच्या बहाण्याने अनेकांना गंडा
By Admin | Updated: March 10, 2016 02:27 IST2016-03-10T02:27:06+5:302016-03-10T02:27:06+5:30
परदेशात नोकरीच्या बहाण्याने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोघा नायजेरियन व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे

नोकरीच्या बहाण्याने अनेकांना गंडा
नवी मुंबई : परदेशात नोकरीच्या बहाण्याने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोघा नायजेरियन व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे. झडतीमध्ये त्यांच्याकडे अमेरिका व न्यूयॉर्कमधील हॉटेलची बनावट मुलाखतपत्रे तसेच व्हिसा अर्ज आढळून आले आहे. तर त्यांच्याकडील संगणकामध्ये १०० हून अधिक भारतीयांची माहिती असल्याने त्यांनाही या टोळीने लाखो रुपयांना फसवल्याची शक्यता आहे.
दिवाळे गाव येथे राहणाऱ्या बलवंतसिंग बिस्त या तरुणाने सीबीडी पोलिसांकडे फसवणूक झाल्याची तक्रार केली होती. त्याला अमेरिकेतील हुट्टन हॉटेलमध्ये कूकच्या नोकरीसाठी ईमेल आला होता. शिवाय फोनवरून देखील एका व्यक्तीने अनेकदा संपर्क साधला होता. यानुसार परदेशात नोकरीच्या अपेक्षेने बिस्त याने नोकरीसाठी संबंधित बँक खात्यात ३ लाख ४८ हजार रुपये जमा केले होते. परंतु पैसे दिल्यानंतर संबंधिताने त्याला बनावट व्हिसा पाठवून अधिक १ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी उपायुक्त शहाजी उमाप, साहाय्यक आयुक्त धनराज दायमा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक मीरा बनसोडे यांनी तपास पथक नेमले होते. त्यानुसार साहाय्यक निरीक्षक जगदीश शेलकर, उपनिरीक्षक संतोष उगलमुगले, हवालदार अखिल काझी, चंद्रकांत वाघ, संदीप पाटील यांच्या पथकाने दोघा नायजेरियन व्यक्तींना अटक केली आहे. अलाडेजूएग्बे जॉन (२८) व अकेलेरे तायवो (२८) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही मूळचे नाजयेरियाचे असून, नालासोपारा येथे राहायला होते. शिक्षणाच्या व्हिसावर भारतात आल्यानंतर व्हिसा संपूनही ते भारतात वास्तव्य करीत होते.
त्यांच्या नालासोपारा येथील घराच्या झडतीमध्ये ३ लॅपटॉप, १२ मोबाइल, १ आयपॅड, २ पेनड्राइव्ह, १ वायफाय राऊटर व ६ इंटरनेट डोंगल असे साहित्य जप्त केल्याचे उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. यापैकी बहुतांश साहित्य त्यांनी घरात विविध ठिकाणी लपवून ठेवलेले होते. त्यांच्याकडील लॅपटॉपमध्ये १०० हून अधिक भारतीयांची माहिती सापडली आहे. त्या सर्वांची परदेशात नोकरीच्या बहाण्याने फसवणूक झाली असल्याचीही शक्यता उमाप यांनी व्यक्त केली आहे. शिवाय अमेरिकेचा व्हिसा फॉर्म, न्यूयॉर्क व अमेरिकेतील आउट हॉटेल, दी ओरलॅन्डो कंपनी, दी स्टेन थोनी, एडेल शिपिंग, अपॅक्स कंपनी अशा अनेक कंपन्यांचे मुलाखत अर्ज व अमेरिका एअरलाइन्सचे ई तिकीट त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहे. त्यांच्या नालासोपारा येथील बँक खात्यात ३६ लाख रुपये आढळून आले आहेत. यावरून त्यांच्या टोळीत इतरही अनेकांचा समावेश असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तर बँक खाते उघडण्यासाठी तसेच मोबाइल सीम कार्डसाठी त्यांनी कोणाच्या कागदपत्रांचा वापर केला, यासंबंधीचा अधिक तपास सीबीडी पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)