रॅपिड अॅक्शन व्हॅनने वाचवले अनेकांचे जीव
By Admin | Updated: June 6, 2016 03:03 IST2016-06-06T03:03:29+5:302016-06-06T03:03:29+5:30
द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातांतील जखमींना तातडीची मदत मिळावी, यासाठी रस्ते विकास महामंडळाने काही महिन्यांपासून शीघ्र कृती व्हॅन तैनात ठेवल्या आहेत.

रॅपिड अॅक्शन व्हॅनने वाचवले अनेकांचे जीव
कळंबोली : द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातांतील जखमींना तातडीची मदत मिळावी, यासाठी रस्ते विकास महामंडळाने काही महिन्यांपासून शीघ्र कृती व्हॅन तैनात ठेवल्या आहेत. रविवारी घडलेल्या भीषण अपघातातील जखमींसाठी या कृती व्हॅन उपयुक्त ठरल्या.
अपघाताची माहिती मिळताच अजिवली येथील शीघ्र कृती व्हॅन दुर्घटनास्थळी दाखल झाली. भीषणता पाहून खालापूर आणि लोणावळा येथील आणखी दोन व्हॅन घटनास्थळी मागविण्यात आल्या. तिन्ही व्हॅनमधील १५ प्रशिक्षित जवानांनी उपलब्ध साधनांचा वापर करून मदतकार्य सुरू केले. मृत आणि जखमींना बाहेर काढण्यात आले. बसचा पत्रा कापून आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीच्या उपचारांसाठी कळंबोली येथील एमजीएम, पॅनेशिया, अष्टविनायक, प्राचीन या रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले. बस २० फूट खोल दरीत कोसळल्याने मदत आणि बचावकार्यात अडथळे येत होते. १२ फुटांच्या दोन शिड्या, दोरखंडांच्या साहाय्याने जवळपास ५0 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात या जवानांना यश आले. बसचा चालक इक्बाल बाबुलाल शेख (५0) हा स्टिअरिंगच्या मध्ये अडकला होता. त्याला बाहेर काढण्याकरिता पाऊण तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले. उजव्या बाजूच्या काचा फोडून त्यातून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. हरिदास सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली चेतन पाटील, अभिषेक पाटील, औदुंबर हावळे, संदीप केदार, सुभाष काशीद, दिनेश धोत्रे, मिलिंद आडसुळ, प्रसन्ना भाटे, सूरज इंगळे, विनायक जाधव, प्रीतम पाटील या जवानांनी बचाव आणि मदतकार्य केले.
पोलीस छावणीचे स्वरूप
अपघातातील दृश्य आणि मदतकार्य पाहण्यासाठी महामार्गावर बघ्यांची एकच गर्दी झाली होती. अनेक जण वाहने थांबवून अपघाताची माहिती घेत होते. त्यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूककोंडी झाली होती.
वाहतूक नियंत्रणात ठेवण्याबरोबरच बघ्यांची गर्दी पांगविण्यासाठी महामार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यामुळे घटनास्थळाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.