कारखानदार हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2016 01:58 IST2016-03-06T01:58:22+5:302016-03-06T01:58:22+5:30

जलाशयात पाणीसाठा कमी असल्याचे कारण देवून तळोजा एमआयडीसीत सुध्दा पाणीकपात करण्यात आली आहे. मात्र यामुळे औद्योगिक वसाहतीत

Manufacturer Hedgehog | कारखानदार हवालदिल

कारखानदार हवालदिल

प्रशांत शेडगे,  पनवेल
जलाशयात पाणीसाठा कमी असल्याचे कारण देवून तळोजा एमआयडीसीत सुध्दा पाणीकपात करण्यात आली आहे. मात्र यामुळे औद्योगिक वसाहतीत तीन-तीन दिवस पाणी येत नसल्याने उद्योगावर परिणाम होऊ लागला आहे. याबाबत पर्यायी व्यवस्था करावी, याकरिता आमदार प्रशांत ठाकूर यांनी टीएमसीच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली. याबाबत त्वरित बैठक लावून उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी उद्योग विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या.
एकूण ९०७ हेक्टर जागेवर एमआयडीसी वसविण्यात आली असून, या ठिकाणी आजमितीला ८२३ छोटे-मोठे कारखाने आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात कारखाने आणि औद्योगिक उलाढाल होत असताना येथे काही प्रमाणात पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचा सूर उमटत होता. त्याचबरोबर औद्योगिक वसाहतीवर पाणीटंचाईचे अस्मानी संकट ओढावले आहे. बारवी व शहाड या दोन पाणीपुरवठा केंद्रातून तळोजा एमआयडीसीला पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणी ३८ एमएलडी पाणी रोज दिले जाते. पाणीसाठा कमी असल्याने जलसंपदा विभागाने पाणीबचतीचे निर्देश एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागाला दिले होते. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने सगळ्या कारखानदारांना ३0 टक्के पाणीकपात तीन महिन्यांपूर्वीच सुरू केली आहे. गुरुवार व शुक्रवार हे दोन दिवस पाणीकपात करण्यात येते. जलशुध्दीकरण केंद्रातून आठवड्यातून ४८ तास पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र शनिवारी सुध्दा कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने तीन दिवस एमआयडीसीतील कारखान्यांना पाणी मिळत नाही. त्यामुळे गुरुवार, शुक्र वार आणि शनिवारी एमआयडीसीचा घशा कोरडा पडत आहे. या ठिकाणच्या बहुतांशी कारखान्यांना पाण्याची आवश्यकता असून तेच मिळत नसल्याने मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे टीएमसीच्या सचिव जयश्री काटकर यांनी सांगितले. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रश्नी लक्ष घालण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांना केली होती. त्यानुसार आ. ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली टीएमसीचे अध्यक्ष संदीप डोंगरे, सचिव जयश्री काटकर, श्याम कारकून, दिलीप परूळेकर, स्वाती वाबळे, परेश देशपांडे, श्रीपाद लेले, मनोहर बोरसे, एम.जी.गोखले, यशवंत ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
काही महिन्यापूर्वी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पाणीटंचाईवर मात्रा म्हणून गळती कमी करण्याची घोषणा केली होती. मात्र गळती अद्याप कमी झाली नसल्याचेही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणूस देण्यात आले. ७५ तासांचा शटडाऊन घेतल्यामुळे कारखान्यादारांना मोठा फटका बसत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. नेरूळ येथील सीईडीपी प्लँटमधून तळोजा एमआयडीसीला पाणी दिले तर पाणीटंचाई दूर होईल, हा उपायही मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत सुचविण्यात आला. तळोजातील टंचाई तातडीने दूर करण्याकरिता संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. त्यामुळे कारखानदारांना दिलासा मिळाला.

Web Title: Manufacturer Hedgehog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.