गणेशोत्सवातून व्यवस्थापनाचे धडे

By Admin | Updated: September 24, 2015 00:38 IST2015-09-24T00:38:42+5:302015-09-24T00:38:51+5:30

राज्यातील सर्वात मोठा उत्सव म्हणून सार्वजनिक गणेश उत्सवाची ओळख निर्माण झाली आहे. या उत्सवातून तरुणांना व्यवस्थापनाचे धडे मिळत आहेत.

Management Lessons from Ganesh Festival | गणेशोत्सवातून व्यवस्थापनाचे धडे

गणेशोत्सवातून व्यवस्थापनाचे धडे

नामदेव मोरे, नवी मुंबई
राज्यातील सर्वात मोठा उत्सव म्हणून सार्वजनिक गणेश उत्सवाची ओळख निर्माण झाली आहे. या उत्सवातून तरुणांना व्यवस्थापनाचे धडे मिळत आहेत. अनेक सामाजिक व राजकीय नेत्यांची सुरवात या उत्सवातून झाली आहे. नेतृत्व गुण विकसित होण्यास मदत होत असून हजारो कार्यकर्ते बाप्पाच्या सेवेसाठी दिवस - रात्र राबत आहेत.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणेश उत्सवास सुरवात केली. नागरिकांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण करण्यासाठी सुरू झालेल्या या उत्सवास १२२ वर्षे झाली. राज्यातील छोट्या खेड्यांपासून महानगरांपर्यंत सर्वत्र सार्वजनिक गणेश उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये जवळपास १५०० सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे आहेत. यामध्ये गृहनिर्माण सोसायटीपासून चार दशकांची परंपरा असणाऱ्या उत्सवांचाही समावेश आहे. गणेश उत्सवासाठी निधी गोळा करण्यापासून ते विसर्जनापर्यंत प्रत्येक मंडळामध्ये ५० पासून ५०० कार्यकर्ते दिवस - रात्र मेहनत करत असतात. निधी संकल, मंडप उभारणी, देखावा, रोजची पूजा, बाप्पाची सुरक्षा, आवश्यक परवानग्या, भाविकांची व्यवस्था व इतर व्यवस्था पाहताना कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाची कसोटी लागत आहे. या उत्सवातून व्यवस्थापनाचे धडे मिळत असल्यामुळे सुशिक्षित तरूणही मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभागी होत आहेत. एकही रूपया मानधन न घेता मंडपामध्ये झाडू मारण्यापासून बाप्पाच्या प्रसादापर्यंतची कामे केली जात आहे. गणेश उत्सवास नेतृत्व घडविणाऱ्या कार्यशाळेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरवात या उत्सवाच्या माध्यमातून झाली आहे.
माजी उपमहापौर भरत नखाते यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरवातही गणेश उत्सवातून झाली. वाशीमध्ये सार्वजनिक गणेश व्यापारी संघाच्या उत्सवाचे हे ३६ वे वर्ष आहे. शालेय जीवनापासून नखाते या मंडळात सक्रिय असून यामुळेच पुढे राजकारणामध्येही चांगले यश मिळविले. वाशी सेक्टर १७ मध्ये नवी मुंबईचा महाराजा म्हणून ओळख असणाऱ्या गणेश मंडळासही तीस वर्षे झाली आहेत. मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरी करणाऱ्या संपत शेवाळे यांनी हा उत्सव सुरू केला. या उत्सवामुळेच पुढे नगरसेवक ते स्थायी समिती सभापतीपर्यंतचा त्यांचा मार्ग सुकर झाला. अनेक सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या कामाची सुरवात गणेश उत्सवातून झाली आहे. या उत्सवामुळे एखाद्या कार्यक्रमाचे व्यवस्थापन कसे करावे, निधी संकलनापासून कार्यकर्त्यांच्या नियोजनापर्यंतचे सर्व व्यवस्थापन शिकण्यास मदत होत आहे. यामुळेच अनेक डॉक्टर, अभियंते, व्यवस्थापन क्षेत्राचा अभ्यास करणारे तरूण या उत्सवात सहभाग घेत आहेत.

Web Title: Management Lessons from Ganesh Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.