Man makes money, but does not get satisfaction: prakash amte | माणूस पैसे कमावतो, पण समाधान मिळत नाही

माणूस पैसे कमावतो, पण समाधान मिळत नाही

 


लोकमत न्यूज नेटवर्क 
कळंबाेली : कोरोनामुळे  सर्व जग ठप्प झाले आहे. कोरोनाचा  प्रादुर्भाव हा निसर्गाचा नाश केल्यामुळे उद्भवत आहे. आयुष्यात निरपेक्ष जगणे खूप महत्त्वाचे असते. माणूस पैसा कमवतो. पण, त्यातून समाधान मिळत नाही. कोरोना काळात आपल्याजवळ भरपूर पैसा आहे. पण त्याचा  काहीच उपयोग करता येत नाही.  पैशांपेक्षा समाधान खूप महत्त्वाचे असल्याचे डॉ. प्रकाश आमटे यांनी सांगितले.
 अभिमान महाराष्ट्राचा या कार्यक्रमांतर्गत फेसबुक लाईव्हवर आदिवासींच्या जीवनातील अंधार  दूर करणारे डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे या दाम्पत्याशी  उत्तरा मोने यांनी संवाद साधला. 
मिती ग्रुप आणि बाविस्कर ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे लोकमत माध्यम प्रायोजक होते. आदिवासींच्या जीवनातील अंधार दूर करण्याबरोबर अनेक वन्यजीवांना आधार देणारे डाॅ. प्रकाश आमटे  यांनी आपल्या जीवनाच्या खडतर प्रवासाबरोबर आदिवासींच्या  हितासाठी केलेल्या कामांचा उलगडा केला. कुष्ठरोगासारख्या महाभयंकर रोगाने ग्रस्त झालेल्यांच्या सेवेचे व्रत स्वीकारलेले  बाबा आमटे यांचा वारसा पुढे चालवण्याचे काम मी केले. आयुष्यात निरपेक्ष काम केले की, समाधान आपोआप मिळते. गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागातील भामरागड या घनदाट अरण्य प्रदेशात आदिवासींची सेवा करण्यास सुरुवात केली. शेकडो मैल अंतर पायी तुडवत, नदी - नाले ओलांडून स्वत:चा जीव धोक्यात घालून आदिवासींची सेवा सातत्याने सुरूच ठेवली. आरोग्याबरोबर शिक्षणालाही महत्व होते. त्यामुळे आदिवासींचे अज्ञान दूर करण्यासाठी शिक्षण आवश्यक होते. त्यानुसार प्रयत्नही  केले. सत्ता माणसाला भ्रष्ट करते. निरपेक्षपणे काम करत राहाणे महत्त्वाचे असल्याचे आमटे यांनी सांगितले.

प्रेमाची भाषा प्राण्यांना जवळची 
nप्राणी आणि  आदिवासी यातील काय  फरक जाणवला. या बाविस्कर ग्रुपचे संचालक प्रकाश बाविस्कर यांनी विचारलेल्या  प्रश्नाला उत्तर देताना आमटे म्हणाले, की  प्रेमाची भाषा सर्वांनाच जवळची वाटते. त्यामुळे प्राणी आणि मनुष्याशी  माझी नाळ जुळली गेली. माकडाच्या पिल्लांची शिकार करुन आदिवासी आपली उपजीविका भागवत. असे लक्षात आल्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन शिकार न करण्यास भाग पाडले. त्या बदल्यात त्यांना तांदूळ दिले आणि माकडाचे पिल्लू घरात ठेवले. आदिवासी  अनेकदा जंगलात सापडलेली अनाथ  पिल्ले ते माझ्याकडे आणून देत होते. 
nअसे करत माझ्याजवळ मोर, वाघ, शेकरू, अस्वल, हरीण यांची भर पडत गेली. त्याचबरोबर बिबट्याच्या बाळंतपणाचा किस्सा त्यांनी  सांगितला. प्रेरणा घेऊन अनेक तरुण काम करत आहेत.

Web Title: Man makes money, but does not get satisfaction: prakash amte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.