पेपर फुटीप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा
By Admin | Updated: March 8, 2017 04:50 IST2017-03-08T04:50:44+5:302017-03-08T04:50:44+5:30
राज्य माध्यमिक शालान्त परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी पोलिसांनी खासगी क्लासच्या शिक्षकासह तीन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. पेपरफुटीचे हे प्रकरण गंभीर असून, त्याची

पेपर फुटीप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा
नवी मुंबई : राज्य माध्यमिक शालान्त परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी पोलिसांनी खासगी क्लासच्या शिक्षकासह तीन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. पेपरफुटीचे हे प्रकरण गंभीर असून, त्याची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करावी, अशी मागणी रिपाइंच्या (आठवले गट) नवी मुंबई युवक आघाडीने केली आहे. युवक आघाडीच्या एका शिष्टमंडळाने मंगळवारी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष दत्तात्रेय जगताप यांची भेट घेवून ही मागणी केली.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. २८ फेब्रुवारीपासून इयत्ता बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. परंतु आतापर्यंत परीक्षेपूर्वीच तीन पेपर फुटल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी वाशी पोलिसांनी खासगी क्लासच्या एका शिक्षकासह तीन विद्यार्थ्यांना अटक केली आहे, तर मुंबई पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पेपरफुटीचे हे प्रकरण अत्यंत गंभीर असून यात संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर रिपाइं युवक आघाडीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी शिक्षण मंडळाचे मुंबई विभागीय अध्यक्ष दत्तात्रेय जगताप यांची भेट घेवून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. रिपाइं युवक आघाडीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विजय मोरे, नवी मुंबई विभागाचे अध्यक्ष विजय कांबळे, ठाणे लोकसभा क्षेत्राचे अध्यक्ष यशपाल ओहोळ, तसेच प्रदेश उपाध्यक्ष नारायण मोरे, युवक सरचिटणीस सचिन कटारे, एल.आर. गायकवाड, बाळू गायकवाड, विनोद वानखेडे, नसीम शहा, गुड्डू शेख आदींचा समावेश होता.